५० वयाच्या पुढील शिक्षकांचा बळी देऊ नका -शिक्षक कामगार संघटनांची चुप्पी
राज्य सरकारने सुट्टीवर पाठविले ,महापालिकेने कोविड ड्युटी वर रुजू होण्याचे आदेश दिले.
खाली पहा राज्य शासनाचा आदेश आणि महापालिकेच्या आदेशाची प्रत
पुणे- महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ७७५ शिक्षकांना कोविड च्या कामास लावण्याचे आदेश दिल्याने सरकारच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचा आरोप महापालिकेच्या शिक्षण विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच केला आहे .यामुळे या ७७५ शिक्षक वर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय ५० वयाच्या पुढील शिक्षकांना देखील कोविड च्या कामाला जुंपल्याने अतिरिक्त आयुक्तांविरुद्ध संताप देखील काही जण व्यक्त करीत आहेत .
याप्रकरणी संबधितांनी आदेशाच्या प्रतीच माध्यमांच्या काही प्रतिनिधींना पुरवल्या आहेत . आणि आवाज उठविण्याची मागणी केली आहे. शिक्षक संघटना ,महापालिका कामगार संघटना या मुग गिळून बसल्याने आम्हाला माध्यमांपर्यंत पोहोचावे लागते आहे असे सांगण्यात आले आहे. कोविड च्या धोका पाहता वय ५० च्या पुढील शिक्षकांना कोविड च्या कामाला जुंपणे गैर असताना त्यांना या कामी जुंपल्याचा आरोप होतो आहे.
याशिवाय प्रामुख्याने ३ मे २०२१ रोजी अतिरिक्त आयुक्त अगरवाल यांनी काढलेल्या आदेशाला आक्षेप घेऊन संताप व्यक्त केला जातोय . या आदेशान्वये ७७५ शिक्षकांना कोविड ड्युटीवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत .वास्तविक पाहता राज्य सरकारने या पूर्वीच म्हणजे ३० एप्रिल २०२१ रोजीच शिक्षकांना १ मे ते १४ जून पर्यंत सुट्टी असल्याचे आदेश काढले होते. सुट्टीवर गेलेल्या शिक्षकांना आता महापालिका पुन्हा हा महापालिकेचा आदेश दाखवून कामावर बोलविण्यात येणार असल्याने शिक्षण विभागात आणि कोविड च्या कामावर नियुक्त केलेल्या बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यात गोंधळ उडाला आहे.