पुणे- आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ओळख ‘धर्मवीर’ म्हणूनच केली गेली आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा होऊ नये, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर रविवारी निशाणा साधला.तर संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान,अफजलखान यांच्या कुळातलेच असावे. धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले. कदाचित तुम्ही पवार नसला, पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते. अशा शब्दात हिंदू राष्ट्रसेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे विधान केले होते. त्या विधानानंतर राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याच दरम्यान आज पुण्यात लाल महाल ते डेक्कन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.
मोर्चात आमदार भीमराव तापकीर, तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई, निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले आहेत. लाल महाल येथून ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आल्यानंतर लक्ष्मी रोडने हा मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी १ वाजण्याच्या सुमारास पोहोचला. त्यावेळी तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, धनंजय देसाई या मान्यवरांची भाषण देखील झाली.
पुणे व्यापारी महासंघातर्फे पिण्याच्या पाण्याचे वाटप
हिंदू जनआक्रोश मार्चाचे स्वागत करून पुणे व्यापारी महासंघातर्फे १५ हजार पाणी बाटल्यांचे वितरण करण्यात आले. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, उपाध्यक्ष अरविंद कोठारी, सहसचिव राहुल हजारे, यशस्वी पटेल, मनोज शहा, मिठालाल जैन, प्रल्हाद लड्ढा, संतोष पटवा या वेळी उपस्थित होते.