पुणे- समाविष्ट ११ गावातील ड्रेनेज संदर्भातील ३९२ कोटीच्या प्रस्तावित कामात सुमारे दीडशे कोटीचा गफला करण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदाराचे संगमात झाल्याचा आरोप महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी केला आहे.
या संदर्भात आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांना आणि माध्यमांना पत्र दिले असून यात संबधित ठेकेदाराच्या नावानिशी हा आरोप केला आहे, ते म्हणाले ,’नव्याने समाविष्ट झालेल्या मैलापाणी शुध्दीकरण केंद्र बांधणे व त्या अनुषंगाने ११ गावात ड्रेनेज लाईन टाकणे याकामी पुणे महापालिकेकडून कार्यवाही चालू असून निविदा मागविण्यात आलेली आहे. सदर निविदा ही विशिष्ट ठेकेदार कपंनीस काम मिळावे या हेतूने संगमताने तयार केलेली आहे असे आम्हास निनावी पत्र आलेले आहे. सदर निविदा उघडण्यापूर्वी आम्ही आपणास ही ठेकेदार कंपनी १० टक्के कमी दराने सहभागी आहे असे खात्रीदायक सांगत आहोत. सदर निविदेचे एस्टिमेटनुसार महापालिकेचे १५० कोटी रकमेचे नुकसान होणार आहे. या निविदेत विशेष अटी व शर्तींचा समावेश करण्यात आला असून यामुळे निविदेमध्ये निकोप स्पर्धा होत नाही. या निविदेनुसार मैलापाणी गोळा करणेसाठी १११ कि.मी.च्या मलवाहिन्या टाकणे, नवीन मुख्य मलवाहिन्या ५० किमी टाकणे, अस्तित्वातील १४ किमीच्या मलवाहिन्यांमध्ये सुधारणा करणे व मांजरी बु येथे १२ एम.एल.डी क्षमतेचे मैलापाणीशुध्दीकरण केंद्र बांधणे व ५ वर्षे देखभाल करणे अशी कामे करण्याचे नियोजित केले असून यासाठी ३९२ कोटी इतका खर्च करणेबाबत अंदाज बांधण्यात आला आहे. वास्तविक हा अंदाज ठेकेदार कंपनीने बांधला असून महापालिकेच्या अधिका-यांनी संगनताने यास मान्यता दिलेली आहे. यानिविदेमुळे महापालिकेचे कोटयावधीचे नुकसान होणार असून यास आमचा तीव्र विरोध आहे.
अधिकारी -ठेकेदार यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड मागवा
महापालिकेचे याविषयी काम करणारे सर्व संबंधित अधिकारी व सल्लागार यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड ३ महिन्याचे कालावधीचे मागविल्यास संबंधित ठेकेदार, संबंधित सल्लागार व संबंधित अधिकारी यांनी संगनमताने काम केल्याचे सिध्द होणार आहे. अधिका-यांना महापालिकेच्या कामासाठी मोबाईल नंबर उपलब्ध करून दिले असून त्याचे रेकॉर्ड महापालिका मागवू शकते. सदर कॉल डिटेल रेकॉर्ड मागविणेबाबत पोलीस विभागातील सक्षम अधिका-यास पुणे महापालिकेकडून तातडीने अवगत करावे.
भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाकडे तक्रार करणार
सदर निविदा ही संबधित ठेकेदार यांनाच मिळणार असून निविदेच्या प्रिबिड मध्ये अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतानाही निविदेत दोनच कंपन्या सहभागी झालेल्या आहेत. सदर निविदेचे १.मुख्य मलवाहिन्या टाकणे, २.मुख्य मलवाहिनीस जोडणा-या मलवाहिनी टाकणे ३.एस.टी.पी बांधणे असे तीन भाग केल्यास यामध्ये निकोप स्पर्धा होवून महापालिकेचे कोटयावधी रूपये वाचू शकतात. तसेच एस.टी.पी. केंद्र बांधणेबाबत जागा ताब्यात आलेली नाही. या सर्व बाबींचा विचार का केला गेला नाही याचा खुलासा करावा.
सदर निविदेत रिंग झाल्याने महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळणेसाठी तातडीने उपरोक्त बाबींचा खुलासा करून महापालिकेच्या हित बघण्यात यावे, सदर निविदेत स्पर्धा न झाल्याने आम्ही भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाकडे तक्रार करणार आहोत याची नोंद घ्यावी.