अखेर ‘एचसीएमटीआर’ रस्ता ‘ट्रॅक’वर ! १२ वर्षांच्या पाठपुराव्याला यश :माजी उपमहापौर आबा बागुल
पुणे: (प्रतिनिधी) नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय ठरणाऱ्या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटच्या अंमलबजावणीसाठी [रिंगरोड ] पालिका आयुक्तांनी २०१९-२० च्या अंदाजपत्रकात २११ कोटी रुपयांची तरदूत केल्याने या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग आता सुकर झाला आहे. गेले बारा वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जीवघेण्या वाहतुकीबरोबरच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग [ रिंग रोड ] महत्वपूर्ण ठरणार आहे,अशी प्रतिक्रिया या रिंग रोडसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी दिली.
यासंदर्भांत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, शहरातील रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व भविष्यातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट’चा आराखडा पूर्ण झाला असून केवळ अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुण्याने मुंबईलाही मागे टाकले आहे. साहजिकच एक मोठे शहर म्हणून पुणे उदयास येत आहे. आता तर स्मार्ट सिटीच्या दिशेने पुण्याचा प्रवास सुरु झाला आहे. विस्तारणाऱ्या या शहराच्या गरजाही वाढल्या आहेत.विशेषतः वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या एचसीएमटीआर रस्त्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे मात्र गेले अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता. प्रशासन पातळीवर प्रक्रिया सुरु होती मात्र मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवल्याने या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे, असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. तसेच स्थायी समितीनेही ३०० कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली आहे.
एकूण ३६.६ किलोमीटर लांबीचा असणारा हा रस्ता संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे. रुंदी २४ मीटरची असणार आहे. या मार्गावर ६ मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी २ बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. इलेव्हेटेड असणाऱ्या या मार्गावर बीआरटीसाठी २८ स्थानके असणार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी ४० वर्षात वाहतुकीत होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ५० किलोमीटर प्रति तास एवढी निश्चित करण्यात आली आहे. सन २०४० पर्यंत वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन या रस्त्याचे नियोजन होणार आहे. या मार्गासाठी ७२ हजार ३४६. ८१६ चौरस मीटर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले आहे.तसेच काही जागेचे भूसंपादन अजून होणे बाकी आहे. या रस्त्याच्या उभारणीसाठी बीओटी , पीपीपी मॉडेल, डिफर्ड पेमेंट यांचा अवलंब करण्याबरोबर केंद्र शासनाच्या योजनांमधून अनुदान मिळविता येऊ शकते अशा सूचनाही यापूर्वीच करण्यात आलेल्या आहेत असेही आबा बागुल यांनी नमूद केले.
गत काही वर्षात शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून वाहतुक नियंत्रणाबाहेर गेली आहे. मेट्रो यासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हालचालीही सुरू आहेत. मात्र, नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी रिंगरोड हा शाश्वत पर्याय ठरला आहे. मागील ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर) आता दिलासादायक ठरणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला हा रिंग रोड आता मार्गी लागणार असल्याने पुणेकरांना शहरांतर्गत भेडसावणारा वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल, असा विश्वासही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी व्यक्त केला.