पुणे, 18 जानेवारी 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत 8 संघांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा 19 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना,डेक्कन जिमखाना, क्लब ऑफ महाराष्ट्र, डीव्हीसीए व पुना क्लब मैदानावर होणार आहेत.
पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव आणि सचिव सिद्धार्थ निवसरकर यांनी सांगितले की, या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुना क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी, कॅडन्स क्रिकेट अकादमी, युनायटेड स्पोर्ट्स आणि ऍबिशियस क्लब हे 8 संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा साखळी व सुपरलीग पध्दतीने होणार आहे. 8 संघांची दोन गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ त्या गटामधल्या प्रत्येक संघाशी एकदा खेळेल. साखळी फेरीचे सामने 19 ते 22 जानेवारी या कालावधीत , तर सुपरलीग फेरीचे सामने 27 ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे. सुपरलीगमधील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम फेरीची लढत होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, पाथ-वे फाउंडेशनच्या वतीने पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेला पाठिंबा दिल्याबद्दल सध्याचा भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव आम्ही त्याचे आभारी आहोत. स्पर्धेचे सामने 45 षटकांचे होणार असून स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्ठीरक्षक आणि मालिकावीर यांना देखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.