- संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता
- ९ हजार ४९८ कर्मचाऱ्यांना फायदा
पुणे (प्रतिनिधी) : ”पीएमपीएमएल’ च्या कर्मचाऱ्यांचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला सातवा वेतन आयोग आणि पुणेकरांच्या सेवेत २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ५०० बसेस रस्त्यावर येणार असा निर्णय पीएमपीएमएलच्या संचालक बैठकीत घेण्यात आल्याचे,’ महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापौर उषा (माई) ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीएमएल संचालक राजेंद्र जगताप, तसेच पीएमपीएमएल संचालक मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
‘पीएमपीएमएलच्या ९ हजार ४९८ कामगारांना याचा फायदा होणार आहे. यासाठी एकूण ३२५ कोटी रूपयांची मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका ६०% म्हणजेच १९५ कोटी रुपये तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ४०% म्हणजे १३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाचा निर्णय सन २०१७-१८ पासून लागू होणार आहे,’ अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.
महापौर मोहोळ म्हणाले की,’ सातव्या वेतन आयोगासोबतच पीएमपीएमएल ताफ्यात दोन प्रकारच्या बसेस प्रक्रियेत २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ५०० बसेस संचालक मंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे.’
‘यामध्ये केंद्र सरकारच्या फेर-२ योजनेअंतर्गत १२ मीटर च्या १५० ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. ६३.९५ रुपये प्रति/किमी दराने घेण्यात येत आहेत. यामधील ७५ बसेस २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत, तर उरलेल्या ७५ बसेस २९ डिसेंबर २०२१ पर्यंत रस्त्यावर उतरतील. केंद्र सरकार एका बसला ५५ लाखांचे अनुदान या फेर योजनेंतर्गत देणार असून, त्याचे एकूण ८२ कोटी रुपये बसेससाठी मिळणार आहेत, त्यातील १६.५ कोटी रुपये जमा झाल्याची’, माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.
महापौर मोहोळ म्हणाले की,’ आणखीन ३५० इलेक्ट्रिकल बसेस भाडेतत्त्वावरती ६७.४० रुपये प्रति/किमी दराने रस्त्यावरती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील २८ मे २०२१ पर्यंत ७५ बसेस, २७ जून २०२१ पर्यंत ७५ बसेस, २७ जुलै २०२१ पर्यंत १०० बसेस आणि २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत राहिलेल्या १०० बसेस रस्त्यावर येणार आहेत.’
‘आजच्या संचालक बैठकीत झालेल्या निर्णयामुळे सर्व संघटना, कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच पुणेकरांच्या सेवेत जवळपास ५०० बसेस २९ डिसेंबर पर्यंत येणार यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यास मदत होणार आहे,’ असे महापौर मोहोळ म्हणाले