पुणे : सहकाराचे सक्षमीकरण व्हावे आणि या क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढावा, याउद्देशाने पुण्यामध्ये ३६ व्या राष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन दिनांक १० व ११ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. इंडियन सोसायटी फॉर स्टडिज इन को -आॅपरेशन, पुणे (आयएसएससी) तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात ही परिषद आहे. देशभरातून ६० पेक्षा अधिक संशोधक आपले शोधनिबंध या परिषदेत सादर करतील. तसेच देशभरातून सहकारातील कार्यकर्ते, प्राध्यापक व संशोधक या परिषदेत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयएसएससीचे मानद सचिव प्रा.अनिल कारंजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संस्थेतर्फे अॅड.सुभाष मोहिते, अॅड.जयंत कुलकर्णी, प्रा.डॉ.मुकुंद तापकीर, संजीव खडके आदी उपस्थित होते. इंडियन सोसायटी फॉर स्टडिज इन को-आॅपरेशन, पुणे (आयएसएससी) यांच्यासह पद्मश्री डॉ.विखे पाटील सावित्रीबाई फुले अध्यासन पुणे विद्यापीठ आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही परिषद होत आहे.
परिषदेचे उद््घाटन शुक्रवार, दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. परिषदेचे उद््घाटन भारतीय राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष दिलीपभाई संघानी (माजी मंत्री, गुजरात) यांच्या हस्ते होईल. यावेळी राज्यमंत्री विद्याधर अनास्कर, माजी सनदी अधिकारी डॉ.एस.के.गोयल, आयएसएससीचे अध्यक्ष जी.एच.अमीन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय परिषदेत सहकाराविषयी व युवकांच्या सहभागासाठी अनेक संशोधन प्रकल्प देखील सादर होणार आहेत. तसेच संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्यात आलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण होईल. यावेळी आर्थिक सहाय्य वितरण देखील होणार आहे.
सहकाराची सहकारी संस्था सक्षम करण्यासाठी आयसीटीचा उपयोग, सहकारी संस्थांची स्वायत्तता आदी विषयांवर चर्चा व मार्गदर्शन परिषदेत होणार आहे. परिषदेचा समारोप शनिवार, दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात होणार आहे. यावेळी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, आयएसएससीचे अध्यक्ष जी.एच.अमीन, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटयूटच्या संचालक डॉ.हेमा यादव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.