श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन ; स्वामी गोविंददेव गिरी महाराज ( किशोरजी व्यास) यांची पुण्यामध्ये प्रथमच श्री दत्त भक्ती कथा
पुणे : बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा दिनांक २ ते ६ डिसेंबर दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम होणार असून स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची पुण्यामध्ये प्रथमच श्री दत्त भक्ती कथा होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी यांनी दिली.
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट व श्री मुकुंद भवन ट्रस्ट तसेच श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग यांच्या सहयोगाने श्री दत्त भक्ती कथा हा कार्यक्रम दररोज दुपारी ४ ते ६ यावेळेत होणार आहे. याशिवाय सायंकाळी आयोजित सप्तस्वरोत्सवात दिनांक २ डिसेंबर रोजी प्रसिद्ध भावगीत व भक्तीगीत गायक अजित कडकडे यांचा कार्यक्रम होईल.
दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रतिभा विनय थोरात यांचा भाव व भक्ती संगीत कार्यक्रम, दिनांक ४ डिसेंबर रोजी श्रीधर फडके यांचा बाबूजी व मी, दिनांक ५ डिसेंबर रोजी पोलीस बांधव व कुटुंबियांसाठी गीतों का सफर ही संगीतरजनी आणि दिनांक ६ डिसेंबर रोजी अमेय ठाकूरदेसाई यांचा नक्षत्रमाला हा कार्यक्रम होणार आहे. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी 6 ते 9 यावेळेत होतील.
ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे. सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
* स्वामी गोविंददेव गिरी महाराज, डॉ.सायरस पूनावाला, हणमंतराव गायकवाड यांना यंदाचा गुरुमहात्म्य पुरस्कार
सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम असलेला गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. धार्मिक कार्यासाठी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार कोव्हिशिल्ड लसीची निर्मीती करणारे सिरम इन्स्टिटयूटचे प्रमुख डॉ.सायरस पूनावाला आणि सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार सार्वजनिक स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेल्या बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शनिवारी इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत गणेश कला क्रीडा मंच येथे होईल. यामध्ये इयत्ता १० वी च्या सर्व विषयांच्या प्रारुप प्रश्नपत्रिका संच देण्यात येतील.