120 महिलांनी घेतला शिबिराचा लाभ
पुणे :
“स्फूर्ती महिला मंडळ’ आणि “समाज विकास विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने समूहसंघटीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आज बुधवार दिनांक 8 जुलै रोजी स्माईल कार्यालय, लोकमान्यनगर येथे आयोजित करण्यात आले होते. स्फुर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा खासदार, ऍड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात 80 समूहसंघटिका आणि वस्तीतील 40 महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर , आस्था ब्रेस्ट कॅन्सर सेंटर आणि माधवबाग यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका मध्ये समूहसंघटिका म्हणून वस्ती पातळीवर तळागाळातील महिलांसाठी काम करणाऱ्या महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. या मध्ये “हार्टरेट’ तपासणी, रक्तदाब तपासणी, ई.सी.जी. व आहारविषयक सल्ला. लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर व आस्था ब्रेस्ट कॅन्सर सेंटर यांच्यावतीने बेस्ट कन्सरची पूर्व तपासणी केली गेली. या शिबिराचे संयोजन प्रदीप्ता कुलकर्णी यांनी केले.
हनुमंत नाझीरकर (मुख्य समाज विकास अधिकारी, पुणे मनपा), उपप्रकल्प अधिकारी मंजुषा कणकुरीकर आणि सुनिल साळवी, संगीता बेलवलकर आदी यावेळी होते. माधवबागचे डॉ. माधवी सागडे, डॉ. प्रिया जगताप, डॉ. संगित गावकरे, सुजीत रासकर (पुणे विभागीय आरोग्य अधिकारी), नितीन सोनुणे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.