सांसद आदर्श ग्राम योजनेतील सुदुंबरे गावात ‘सुदुंबरे महोत्सवा’ची सांगता
पुणे :
सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी मावळ तालुक्यातील दत्तक घेतलेल्या सुदुंबरे गावामधील ‘सुदुंबरे महोत्सवा’ची नुकतीच सांगता झाली. भारत(आप्पा) पाटील (जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोल्हापूर) यांच्या हस्ते महोत्सवातील विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके आणि विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी सुदुंबरे गावाच्या वेबसाईटचे व ग्राम गीताचे अनावरण देखील करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुदुंबरे ता.मावळ येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. या महोत्सवातंर्गत हिमोग्लोबिन तपासणी, रक्तगट तपासणी, अॅनिमिया तपासणी, आधारकार्डचे वाटप, पालक व बालकांसाठी संस्कार वर्ग, स्वच्छता दिन, पाककला प्रशिक्षण, ‘लायन्स क्लब’च्या सहकार्याने वैद्यकीय तपासणी शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी सभापती मंगला वाळुंजकर, माजी आमदार दिगंबर भेगडे, शरद पाटील (तहसीलदार, मावळ), गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, संजीवनी जोगळेकर, गुलाबराव म्हाळस्कर (संजय गांधी निराधार योजना मावळ तालुका अध्यक्ष), रोहिदास गाडे (सामाजिक कार्यकर्ते), दत्ता येळवंडे (उद्योजक), नितीन भेगडे (सरपंच), बाळकृष्ण गाडे (उपसरपंच), सौ संगीता भांगे, विजय देवकर, उत्तम गाडे, सुनील दरेकर, स्वाती गाडे, कविता गाडे, शारदा गाडे (ग्रामपंचायत सदस्य), शरद ढोले (ग्रामसेवक) आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास गाडे व कल्पना गाडे यांनी केले. तर आभार संजय गाडे यांनी मानले.
महोत्सवातंर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘लायन्स क्लब वडगाव’ व ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’ यांच्या’वतीने आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमामध्ये प्रीती विनायक गाडे यांचा प्रथम क्रमांक आला. त्यांचा पैठणी देवून सत्कार करण्यात आला. प्राथमिक शाळेतील मुलांसाठी खो-खो व कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक ‘सुदुंबरे टायगर’, द्वितीय क्रमांक ‘सुदुंबरे चॅलेंजर’, तृतीय क्रमांक ‘सुदुंबरे फायटर’ यांनी पटकाविला विजेत्या संघाला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महोत्सवातंर्गत देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये गावामध्ये विशेष काम करणार्या कुटुंबाचा गौरव करण्यात आला. पोपट दिवेकर यांना ‘कृषीरत्न पुरस्कार’, डॉ.श्रीनिवास राव यांना ‘सुदुंबरे भूषण पुरस्कार’, सीताराम गाडे व जयश्री गाडे यांना ‘आदर्श माता पिता पुरस्कार’ तर संजय गाडे (सहायक निबंधक ढाणे) यांना शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.