पुणे:
“ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि “जाणीव सामाजिक संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आगमन होणाऱ्या तुकाराम आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात जनजागृती करण्यासाठी “तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ शुक्रवार 10 जुलै 2015 रोजी दुपारी 2.30 वाजता वाकडेवाडी येथून आयोजित केला आहे. ही दिंडी माउलींच्या पालख्यांच्या आगमनापूर्वी काढण्यात येणार आहे, अशी माहिती “ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’च्या वतीने डॉ. सायली कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी आणि जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने मधूकर बिबवे, राजेंद्र शेलार, प्रमोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यात आगमन होणाऱ्या तुकाराम आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालख्यांसमवेत “ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि “जाणीव सामाजिक संस्था’ या दोन्ही संस्थंातर्फे जनजागृतीसाठी “तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ काढण्यात येणार आहे.पालखी वाकडेवाडी ते अलका चौक या मार्गे जाणार आहे. या दिंडी मध्ये 300 ते 350 विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी “होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ याविषयी जनजागृतीसाठी पत्रके वाटण्यात येणार आहेत.
या पालखी सोहळ्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रातिनिधीक स्वरुपाची होळी करण्यात येणार आहे. तंबाखूमक्तीची ही पताका आपल्या महाराष्ट्रात उंचविणतयासाठी आणि तंबाखू मुक्त महाराष्ट्रासाठी या उपक्रमात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे.
यावर्षी ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या जीवनहानी बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी “होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच अभियानाच्या पुढील टप्यात “तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. “होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियानाचे “ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर’ म्हणून झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका “जय मल्हार’ मधील खंडोबा ची भूमिका करणारे कलाकार देवदत्त नागे आणि स्टार प्रवाह वरील “पुढचं पाऊल’ मालिकेतील कल्याणी ची भूमिका करणारी कलाकार जुई गडकरी हे या अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.