कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या ,चार महिन्यांपासून पगार न मिळालेल्या सफाई कामगाराचा कामावर हृदय विकाराने मृत्यू क्षेत्रीय कार्यालयाच्या बेपर्वाई मुळे कामगाराचा मृतदेह सहकाऱ्यांनी नेला पालिकेत :बिबवेवाडीतील घटना
पुणे :
कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या ,चार महिन्यांपासून पगार न मिळालेल्या नितीन दत्तात्रय मांजरेकर या सफाई कामगाराचा बिबवेवाडी येथे सकाळी सात वाजता कामावर असताना हृदय विकाराने मृत्यू झाला .
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाला हि घटना कळवूनही क्षेत्रीय अधिकारी सुनील गायकवाड यांनी काहीच दखल न घेतल्याची तक्रार आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पर्वती मतदार संघ अध्यक्ष सतीश वाघमारे यांनी केली
सतीश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,आज सकाळी ही घटना घडली . बिबवेवाडी परिसरातील राजकीय ,सामाजिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नितीन मांजरेकर यांना सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल केले पण त्यांचा मृत्यू झाला होता . कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या सफाई कामगारांनी चारच दिवसापूर्वी क्षेत्रीय कार्यालयावर आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता . संतप्त कार्यकर्त्यांनी आणि कामगारांनी पालिका अधिकाऱ्यांच्या बेपर्वाई च्या निषेधार्थ मांजरेकर यांचा मृतदेहच पालिकेत नेला .
पालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे सफाई कामगारांच्या अडचणी मांडण्यात आल्या आणि मृत कामगार नितीन मांजरेकर यांना नुकसान भरपाई ,कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी केली . अखेर आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी बोलल्यावर मागण्या मान्य झाल्या आणि मृतदेह पालिकेतून हलविण्यात आला . यावेळी गणेश बिडकर आणि नगरसेवक पिंटू धाडवे उपस्थित होते .
मृत नितीन मांजरेकर यांना चार महिन्यापासून पगार मिळालेला नव्हता आणि त्यांच्या २ मुलींच्या एडमिशन साठी ते चिंताग्रस्त होते . कंत्राटी सफाई कामगारांना ठेकेदार किवा पालिका प्रोव्हिडंड ,इ एस आय ,विमा अशा कोणत्याच सुविधा देत नाही अशी तक्रार कामगारांनी केली
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पर्वती मतदार संघ अध्यक्ष सतीश वाघमारे ,दुर्गामाता मित्रमंडळ ,बंधुत्व मित्र मंडळ आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी दिवसभर नितीन मांजरेकर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी धावपळ केली