अण्णा हजारे यांच्यावर एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयात दंतोपचार
अण्णांनी भावी डेन्टीस्ट डॉक्टर्स शी साधला संवाद :जीवनात सेवेची संधी घ्या
पुणे :
प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळी (मंगळवारी ) महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एजुकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयात दंतोपचार (रूट कॅनाल ट्रीटमेंट ) घेतले . याआधी त्यांनी महाविद्यालयाच्या बी डी एस आणि एम डी एस विद्यार्थ्यांशी संवाद साधला . संस्थेच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार ,दंत महाविद्यालयाचे प्राचार्य रमणदीप दुग्गल ,उप प्राचार्य डॉ . विवेक हेगडे ,सचिव आर ए शेख यांनी स्वागत केले .
डॉ विवेक हेगडे यांच्या टीमने ७८ वर्षीय अण्णांच्या दाताची तपासणी केली,क्ष -किरण तपासणी केली आणि रूट कॅनाल उपचार केले
त्याआधी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अण्णा हजारे म्हणाले ,’ जीवन हे सेवेसाठी आहे . डॉक्टरांनी सेवेचे पैसे घ्यावेत पण फक्त पैशासाठी जगू नये . जीवनात पैसा हे सर्वस्व मानून कोणीही काम करू नये . डॉक्टरांना सर्वांच्या सेवेची संधी मिळत असल्याने त्यांनी ऐहिक आनंदापेक्षा सेवेच्या आनंदाला प्राधान्य द्यावे .
युवाशक्ती जागृत झाली तर देश बदलेल यावर आपला विश्वास आहे असे सांगून ते म्हणाले ‘जनलोकपाल साठी पुन्हा आंदोलन करण्याचे नियोजन आहे ‘
संस्थेच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार यांनी शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देवून अण्णा हजारे यांचा सत्कार केला . प्रदीप मुनोत ,पठारे ,डॉ अन्वर शेख उपस्थित होते