पुणे -अखिल मंडई गणपती मंडळाच्या शारदा गजानन मंदिरातून चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज आज सकाळी एका दुर्दैवी वडिलांनी कोथरूड पोलीस ठाण्यात आणून जमा केला . देवाच्या मूर्तीच्या अंगावरील दागिने चोरून नेणारा आरोपी विजय कुंडले मात्र यावेळी फरार झाला . त्याच्या वडिलांनी पोलिसात हे दागिने आणून दिल्यानंतर पोलिसांनी दुपारी त्याला पुणे न्यायालय परिसरात नळाच्या तोट्या चोरताना पकडले . दारू-गांजा यांच्या नशेत त्याने दागिन्यांची चोरी केल्याचे सांगण्यात येते
मंडई परिसरात असलेल्या शारदा गजानन मंदिरात बुधवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास चोरी झाली होती. मूर्तीवरील सुमारे ४३ लाख ४८ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले होते. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असतानाही, हा प्रकार घडल्यानं अधिकच खळबळ उडाली होती. सुदैवानं, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी बंदिस्त झाली होती. त्या आधारे पोलिसांनी चोरट्याचं रेखाचित्रही जारी केलं होतं. या प्रकरणी मंदिराचे पुरोहित श्रीपाद कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता.
कोथरूडला राहणारे कुंडले यांनी गणपतीची सर्व आभूषणे कोथरूड पोलीस ठाण्यात जाऊन जमा केली. त्यांच्या मुलानं, विजय कुंडलेनं ही चोरी केल्याचं त्यातून उघड झालं.