मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हेआता नथुराम गोडसेच्या भुमिकेत दिसणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:च आपल्या फेसबुक पोस्ट्सद्वारे दिली आहे.’व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 2017 सालचा असून तो सध्या फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 30 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Why I killed Gandhi)यावर आता त्यांच्याच पक्षातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी आता ट्विट करत म्हटलंय की, डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही.
पुढे त्यांनी म्हटलंय की, विनय आपटे-शरद पोंक्षे यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केला, त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
जितेंद्र आव्हाड यांनी याआधी म्हटलंय की, पक्षाचा आणि सर्वांचा काही संबंध असतो असे मला वाटत नाही. राज्यातील कुठल्याही कलाकाराने नथुरामाची भूमिका करावी, हे मला पटलेले नाही. अभिनय वरवर करता येत नाही. एक कलाकार या नात्याने त्यांनी भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे म्हटलंय. एकप्रकारे त्यांनी अमोल कोल्हे यांच्या या अभिनयावरुन नाराजीच व्यक्त केली आहे.




