महाराष्ट्राच्या आत-बाहेरही 4,588 टन मालवाहतूक साध्य
भारतातील सर्वात मोठी एअर कार्गो ऑपरेटर व मालवाहू विमानांचा खास ताफा बाळगणारी एकमेव देशी कंपनी असणाऱ्या ‘स्पाइसजेट’ने 25 मार्च 2020 पासून आतापर्यंत पुण्याकडे व पुण्यातून 55 टन इतकी विक्रमी मालवाहतूक केली आहे. यासाठी या कंपनीने 14 मालवाहू उड्डाणे केली, तसेच प्रवासी विमानांचाही वापर केला. विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणीदेखील या कंपनीने अनेक मालवाहू उड्डाणे चालविली.
‘स्पाइसजेट’ने मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे यांसहीत संपूर्ण महाराष्ट्रात 4,588 टन इतकी मालवाहतूक केली आहे. महाराष्ट्रातून व महाराष्ट्राकडे अशी 552 उड्डाणे 25 मार्च 2020 पासून या कंपनीने केली आहेत.
‘स्पाइसजेट’च्या दृष्टीने पुणे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. आपल्या खास मालवाहू विमानांच्या ताफ्यातून अत्यावश्यक वस्तू व वैद्यकीय सामानाची ने-आण करून ‘स्पाइसजेट’ने टाळेबंदीच्या काळातही मालवाहतूक सुरळीत ठेवली.
26 मार्च 2020पासून या कंपनीने मालवाहतुकीची देशांतर्गत 14 उड्डाणे पुण्याकडे व पुण्यातून केली व त्यांतून 55 टन इतका माल वाहून नेला. यामध्ये बंगळुरू, दिल्ली, मुंबई व नागपूर या शहरांमधून झालेल्या उड्डाणांचा समावेश आहे.
‘स्पाइसजेट एअरलाइन’ने मुंबईत येणारी व मुंबईहून जाणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करणारी 162 उड्डाणे केली व त्यांमधून 2,490 टन माल नेला. अबू धाबी, बाहरीन, बँकॉक, कंबोडिया, ढाका, दुबई, जेद्दा, काठमांडू, कुवेत, मस्कत, म्यानमार, रस अल खैमाह, रियाध, शारजा आणि सिंगापूर या ठिकाणची ही ने-आण करणारी उड्डाणे होती.
त्याचबरोबर, या कंपनीने मुंबईत येणारी व मुंबईहून जाणारी देशांतर्गत मालवाहतूक करणारी 369 उड्डाणे केली व त्यांमधून 1,969 टन माल नेला. अहमदाबाद, औरंगाबाद, बंगऴुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोझिकोड, कोलकाता, कोची, नागपूर, पुणे, सूरत, तिरुअनंतपुरम आणि विशाखापट्टणम या ठिकाणची ही उड्डाणे होती.
या व्यतिरिक्त, या एअरलाइन कंपनीने औरंगाबाद येथून मालाची ने-आण करणारी दिल्ली व मुंबई येथील 2 देशांतर्गत उड्डाणेही केली व तींमधून 4.5 टन माल वाहिला. नागपूरहून पुणे, दिल्ली व मुंबई अशी 19 देशांतर्गत उड्डाणे करून त्यांतून 69 टन मालाची वाहतूकही ‘स्पाइसजेट’ने केली.
‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, “अत्यावश्यक वस्तू, थंड हवामानात ठेवण्याजोग्या वैद्यकीय वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे व मदत साहित्याचा पुरवठा कमीतकमी वेळेत व्हावा, यासाठी आपला मालवाहू विमानांचा ताफा ‘स्पाइसजेट’ने वापरला आहे. संपूर्ण देशभरात टाळेबंदी सुरू केल्यापासून जवळपास 2,570 उड्डाणांमधून 18,100 टन मालाची वाहतूक आमच्या कंपनीने केली आहे. हे प्रमाण सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांच्या एकत्रित क्षमतेच्याही दुप्पट आहे. आमची मालवाहतूक आणि प्रवासी सेवा या दोन्ही गोष्टींसाठी पुण्यात आम्हाला प्रचंड क्षमता दिसली आहे आणि आम्ही आगामी काळात या क्षमतेचा विस्तार करीत राहणार आहोत.”
“टाळेबंदीच्या कालावधीत आमची मालवाहतूक वेगाने वाढली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही सुमारे 100 कार्गो उड्डाणे चालविली. आता आम्ही एवढी उड्डाणे दोन दिवसांपेक्षा कमी वेळात करतो. आज ‘स्पाइसएक्स्प्रेस’ ज्या स्तरावर आहे, तेथे ती आणण्यासाठी ‘स्पाइसजेट’ला वेळ, ऊर्जा आणि पैसा यांची मोठी गुंतवणूक करावी लागली आहे. आम्ही वाहून नेत असलेल्या अनेक गोष्टींमध्ये रक्ताचे नमुनेदेखील असतात. त्यांना तपमाननियंत्रित वातावरणाची आवश्यकता असते. त्यासाठीची सुविधा आता आमच्या विमानांत आहेत, त्याशिवाय आमच्या ग्राउंड सपोर्ट वाहनांमध्येही आहे. आज आमच्याकडे भारतभरातील 12,500 हून अधिक ‘पिन कोड’वर अगदी दारांत सामान पोहोचविण्याची क्षमता आणि अनुभव आहे. याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या ग्राहकांना ‘स्पाइसटॅग’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत देतो. यातून प्रत्येक ग्राहकाला समर्पित अशा कार्गो ग्राहक सेवा कार्यसंघामध्ये प्रवेश मिळू शकतो.”
स्पाइसजेट नियमितपणे वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रियेची उपकरणे, सॅनिटायझर्स, फेसमास्क, कोरोना व्हायरससाठीची त्वरीत चाचणी किट, आयआर थर्मामीटर इत्यादींची वाहतूक करीत आहे. आंतरराष्ट्रीय रिटेलर्स, वैद्यकीय व औषधी कंपन्या यांना अत्यावश्यक वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे, शीतगृहाची आवश्यकता असलेल्या वैद्यकीय वस्तू आम्ही ‘कोविड-19’च्या उद्रेकाच्या काळात अगदी दारांत नेऊन देत आहोत. भारतीय शेतकर्यांना शेतीतील उत्पादने, ताजी फळे आणि भाजीपाला या वस्तू देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ठिकाणी नेणे सोईचे व्हावे, म्हणून विशेष मालवाहू उड्डाणे चालवून, त्यांची पुरवठा साखळी सुरू ठेवण्यास या एअरलाइनने मदत केली आहे.
देशभरात टाळेबंदी सुरू झाल्यापासून ‘स्पाइसजेट’ने आपली आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. अबू धाबी, आलमाटी, बगदाद, बाहरीन, बँकॉक, बिश्केक, कंबोडिया, कैरो, सेबू, कोलंबो, ढाका, दोहा, दुबई, गुआंगचौ, हो चि मिन्ह, हाँगकाँग, हुआंगझू, इंचेऑन, जकार्ता, काबुल, काठमांडू, खार्टूम, किर्गिस्तान, कौलालंपूर, कुवेत, माले, मॉस्को, म्यानमार, शांघाय, शारजा, सिंगापूर, सुलैमानिय्या, ताश्कंद, युक्रेन आणि इतर अनेक ठिकाणी ही सेवा आता वाढली आहे. आज, ‘स्पाइसजेट’चे मालवाहू नेटवर्क 45 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर पसरलेले आहे आणि त्यापैकी बहुसंख्य ठिकाणे ही टाळेबंदीच्या कालावधीत जोडली गेलेली आहेत.
‘स्पाइसजेट एअरलाइन्स’ने आपला समर्पित कार्गो विभाग, स्पाइसएक्सप्रेस, हा सप्टेंबर 2018 मध्ये सुरू केला होता. ‘स्पाइसजेट’ने आपल्या ‘क्यू-400’ श्रेणीतील 3 विमानांचे रुपांतर मालवाहू विमानात नुकतेच केले आहे. मध्यम व लहान शहरांमध्ये चालविण्यासाठी ती विमाने विशेष उपयुक्त आहेत. या कंपनीकडे आता आठ मालवाहू विमानांचा समर्पित ताफा आहे.
सात एप्रिल रोजी ‘स्पाइसजेट’ने प्रवासी केबिन आणि ‘बेली स्पेस’मध्ये वैद्यकीय आणि जीवनावश्यक वस्तू ठेवून भारतात प्रथमच ‘आसनावर माल’ स्वरुपाचे उड्डाण केले. तेव्हापासून, आम्ही प्रवासी केबिनमध्ये मालवाहतूक करण्यासाठी नियमितपणे आमची ‘B737’ आणि ‘Q400’ प्रवासी विमाने तैनात करीत आहोत.