पुणे-: टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) या कंपनीला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं. लि.कडून (एमएसइडीसीएल) महाराष्ट्रात 100 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम मिळाले आहे. या संदर्भात ‘एमएसइडीसीएल’कडून ‘टीपीआरईएल’ला पत्र पाठविण्यात आल्याचे ‘टाटा पॉवर कंपनी’कडून घोषित करण्यात आले. भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी असलेल्या ‘टाटा पॉवर’ची टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी ही संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
‘टीपीआरईएल’तर्फे ‘एमएसइडीसीएल’ला वीज खरेदी कराराच्या (पीपीए) अंतर्गत वीजपुरवठा केला जाईल. हा करार वीजपुरवठा कार्यान्वित झाल्याच्या तारखेपासून 25 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल. ‘एमएसइडीसीएल’ने डिसेंबर 2019 मध्ये पाचव्या टप्प्यांतर्गत जाहीर केलेल्या बोलीमध्ये ही ऑर्डर ‘टीपीआरईएल’ने मिळवली आहे. कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या आत हा प्रकल्प सुरू करणे ‘टीपीआरईएल’ला आवश्यक राहील.
या कामगिरीबाबत बोलताना ‘टाटा पॉवर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, महाराष्ट्रात 100 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प मिळाला, ही घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो. ही संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व ‘एमएसइडीसीएल’च्या अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. या करारामुळे अपारंपारिक ऊर्जा निर्माण करण्याची आमची एकूण क्षमता 3,557 मेगावॅट इतकी होईल.’’
‘’जीयूव्हीएनएल’कडून मिळालेल्या कराराची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. अपारंपारिक उर्जा निर्मिती, तसेच प्रकल्प विकास, अभियांत्रिकी आणि अंमलबजावणीच्या क्षमता यांच्या पूर्ततेविषयी आम्ही दृढपणे कटिबद्ध आहोत. आपल्या क्षमता वाढविणे, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि सर्व कामांमध्ये उच्च मापदंड निर्माण करणे हे आमचे कार्य यापुढेही सुरू ठेवू, याची आम्ही हमी देतो,’’ असे ‘टाटा पॉवर’चे रिन्यूएबल्स विभागाचे प्रमुख आशिष खन्ना यांनी सांगितले.
या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 240 मेगायुनिट इतक्या उर्जेचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी सुमारे 240 दशलक्ष किलो कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन या प्रकल्पातून होईल.
‘टाटा पॉवर’ची अपारंपारिक उर्जा निर्मितीची क्षमता या प्रकल्पामुळे 3,557 मेगावॅटपर्यंत वाढणार आहे. एकुणातील 2,637 मेगावॅट ऊर्जा कार्यान्वित झालेली आहे आणि या नव्या करारातील 100 मेगावॅट क्षमतेसह 920 मेगावॅट ऊर्जा निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.