पुणे-: भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने आपल्या वाटचालीत आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे. भारतातील सर्वात मोठे कारपोर्ट उभारणीसाठी टाटा पॉवर व टाटा मोटर्स यांच्या दरम्यान वीज खरेदी करारावर आज स्वाक्षऱ्या केल्या गेल्या. या संपूर्ण प्रकल्पाची क्षमता ६.२ एमडब्ल्यूपी असणार आहे आणि त्यामुळे टाटा मोटर्सला आपल्या संपूर्ण जीवनकाळात १.६ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखता येईल अशी अपेक्षा आहे.
हे कारपोर्ट ग्रिडला जोडले जाणार असून या प्लांटमध्ये कारपोर्टमधील प्रचंड मोठ्या संरचना उभारणीसाठी उच्चस्तरीय अभियांत्रिकी आणि विशेष तयार करण्यात येणाऱ्या रचना आवश्यक आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि काटेकोर, तपशीलवार नियोजन ही टाटा पॉवरची बलस्थाने आहेत जी या प्रकल्पाच्या कार्यान्वयनामध्ये खूप उपयोगी ठरणार आहेत.
या प्रकल्पाबद्दल टाटा पॉवरचे एमडी श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “वन टाटा उपक्रम म्हणून भारतातील सर्वात मोठे कारपोर्ट उभारण्यासाठी टाटा मोटर्ससोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला पक्का विश्वास आहे की कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये हा वीज खरेदी करार अतिशय अनुकूल भूमिका बजावेल. पर्यावरणस्नेही संसाधने शोधून काढून त्यांना आपल्या व्यावसायिक कामांमध्ये उपयोगात आणण्याचे नवनवीन मार्ग आम्ही भविष्यातही शोधत राहू.“
नवीन प्रकल्पाबद्दल टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष – पीव्ही ऑपरेशन्स श्री. राजेश खत्री यांनी सांगितले, “टाटा पॉवरसोबत भारतातील सर्वात मोठे कारपोर्ट उभारण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत कारण यामुळे आम्हाला आमचे कार्बन उत्सर्जन रोखता येईल. भविष्यातील पर्यावरणस्नेही संचालन आणि ऊर्जा वापर यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”
सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी जागेच्या सक्षम वापराच्या दृष्टीने सोलर कारपोर्ट्स ही अतिशय उत्तम उदाहरणे असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. भविष्यात रुफटॉप क्षेत्राच्या विकासासाठी कारपोर्ट्स खूप सक्षम ठरू शकतील.
टाटा पॉवर सोलर ही टाटा पॉवरची सौरऊर्जा निर्मिती करणारी कंपनी असून एकाच ठिकाणी जगातील सर्वात मोठे रुफटॉप उभारण्याचा यशस्वी अनुभव टाटा पॉवर सोलरच्या गाठीशी आहे. अमृतसर (१६ मेगावॅट), कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (२.६७ मेगावॅट), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया जगातील सर्वात मोठे सौरऊर्जेवर चालणारे क्रिकेट स्टेडियम (८२०.८ केडब्ल्यूपी), डेल बंगलोर येथे उभारण्यात आलेले सोलर व्हर्टिकल फार्म (१२० केडब्ल्यू), टाटा केमिकल्स, नेल्लोर येथे १.४ मेगावॅट क्षमतेचे फ्लोटिंग सोलर आणि असे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प टाटा पॉवर सोलरने उभारले आहेत. त्याचप्रमाणे देशात सर्वत्र लोकांना सौरऊर्जेविषयी जागरूक करण्यासाठी घरांच्या छतांवर सौरऊर्जा रुफटॉप उभारणीचे काम देखील टाटा पॉवर सोलर मोठ्या प्रमाणावर करत आहे.