पुणे – इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्सच्या (इशरे) पुणे चॅप्टरतर्फे त्यांच्या ग्रीन कॉन्क्लेव्ह 23 या अनोख्या कार्यक्रमात प्रवीण मसालेवाले कंपनीचे टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन संचालक तथा द इकोफॅक्टरी फाऊंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया यांचा ‘एलेमेंट ऑफ अर्थ ॲवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. डॉ. अंशुल गुजराथी यांनी आमंत्रित केलेल्या व सुझलॉन वन अर्थ कॅम्पस येथे झालेल्या या कार्यक्रमाला ४५० हून अधिक सहभागी उपस्थित होते.
हा पुरस्कार जागतिक पातळीवरील प्रख्यात शाश्वत वास्तुविशारद प्रा. ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर (एफएसएआय, आयपीए व एईएसए संस्थांचे अध्यक्ष) तथा इशरेचे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे यांच्या हस्ते श्री. चोरडिया यांना देण्यात आला.
आनंद चोरडिया यांनी पर्यावरण शाश्वतता क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. शाश्वतता व पर्यावरण संवर्धनाचा मार्ग अनुसरणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यामागे श्री. चोरडिया यांचे कार्य कारणीभूत ठरले आहे.
यांसदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंद चोरडिया म्हणाले, की पृथ्वी, जल, अग्नी, आकाश व वायू या पाच महातत्त्वांतर्गत हे पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी पृथ्वी तत्त्वांतर्गतचा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. हा पुरस्कार मला माझ्या ध्येयाच्या दिशेने अधिक काम करण्यासाठी प्रेरणादायी आहे आणि स्वच्छ, हरित, आरोग्यपूर्ण, शाश्वत व समृद्ध भारत साकारण्याप्रती माझ्या प्रयत्नांना सातत्य देणाराही आहे. ग्रामीण व नागरी समाजाला शाश्वत जीवनशैली उपाय पुरवण्याचा माझा ध्येय दृष्टीकोन आहे.