आभासी पद्धतीने घरखरेदीची सुविधा देऊन रिअल्टी क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याची नांदी
नवी दिल्ली – घर खरेदी करणे सर्वांना शक्य व्हावे आणि त्याची प्रक्रिया सुलभ असावी, या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रेडाई आवास अॅप’चे आणि ‘नरेडको’च्या ‘हाऊसिंगफॉरऑल डॉट कॉम’ या ‘ऑनलाईन पोर्टल’चे अनावरण केंद्रिय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयातर्फे करण्यात आले. केंद्रिय गृहनिर्माण, नगरविकास व हवाई वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते एका वेबिनारमध्ये ‘अॅप’ व ‘पोर्टल’ सादर करण्यात आले. घरखरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना एक विश्वासार्ह मंच मिळावा आणि त्यांना विकसकांशी थेट संपर्क साधता यावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
‘क्रेडाई आवास अॅप’ हा गृहनिर्माण प्रकल्पांचा शोध घेण्याबाबतचा भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. यातून देशातील 220 शहरांमधील प्रकल्पांची सविस्तर माहिती ल आभासी पद्धतीचा अनुभव ग्राहकांना मिळू शकेल. तसेच ‘क्रेडाई’तील विकसकांच्या रेरा मान्यताप्राप्त प्रकल्पांमधील घरे पारदर्शक पद्धतीने खरेदी करण्याची सुविधाही या ‘अॅप’मधून मिळेल.
‘क्रेडाई आवास अॅप’चे फायदे :
– घर खरेदीची प्रक्रिया सोपी व्हावी, हा भारत सरकारचा हेतू यात साध्य होतो.
– ‘क्रेडाई’चे सदस्य असलेले विश्वासार्ह विकसक व ग्राहक हे एकाच मंचावर उपलब्ध असल्याने मध्यस्थांशिवाय, पारदर्शक पद्धतीने व्यवहार शक्य; त्यातून ग्राहकांच्या हितांचे रक्षण होते.
– विकसक आणि ग्राहक यांच्यात विश्वास वाढीस लागतो.
रिअल इस्टेट क्षेत्रासाठी पारदर्शक परिसंस्था स्थापित करण्यात मदत होते; तसेच खरेदीदार, विकसक, रेराचे सदस्य आणि बिल्डर व अर्थपुरवठादार यांसारख्या सर्व भागधारकांमध्ये एकाच व्यासपीठावर जागरूकता व माहिती यांचा प्रसार होतो.
याप्रसंगी केंद्रिय गृहनिर्माण, नगरविकास व हवाई वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले, ‘’क्रेडाई व नरेडको यांनी ‘क्रेडाई आवास अॅप’ आणि ‘हाऊसिंगफॉरऑल डॉट कॉम’ पोर्टल सादर केल्याबद्दल आम्ही अतिशय समाधानी आहोत. घरखरेदीच्या प्रक्रियेमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा निर्माण झाला आहे. परवडणाऱ्या घरांच्या संकुलाचे सादरीकरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘2022पर्यंत सर्वांसाठी घरे’ या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीतील महत्त्वाचे पाऊल आहे.‘’
‘क्रेडाई नॅशनल’चे चेअरमन जक्षय शहा म्हणाले, ‘’प्रॉपटेक हे रिअल इस्टेट क्षेत्राचे भवितव्य आहे.‘क्रेडाई आवास अॅप’सारख्या उपक्रमांमधून ग्राहक व विकसक यांच्यात समन्वय मोठ्या प्रमाणात साधता येईल. ग्राहकांना भारतभरातील विविध विकसकांशी थेट संपर्क साधता येईल आणि घर खरेदीच्या स्वप्नाची पूर्तता एका क्लिकने करता येईल, असे या ‘अॅप’चे वैशिष्ट्य आहे.‘’
‘क्रेडाई आवास अॅप’ सादरीकरणाबाबत ‘क्रेडाई नॅशनल’चे प्रेसिडेंट सतीश मगर यांनी सांगितले, ‘’कोविड-19च्या अचानक आलेल्या संकटामुळे लोकांना स्वतःचे घर असण्याचे महत्त्व लक्षात आले आहे, तसेच गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेट हा सर्वात सुरक्षित पर्याय असल्याची जाणीवही त्यांना झाली आहे. तंत्रज्ञानाच्या शक्तीच्या आधारे घर खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी आणि ग्राहक व विकसक यांच्यात विश्वासाचे नाते जोपासले जावे, हा हेतू ‘क्रेडाई’च्या ‘आवास अॅप’मधून साध्य होतो. हा एक अनुभव घेण्याजोगा व परस्परसंवादी असा प्लॅटफॉर्म आहे. ग्राहकांना यामधून मालमत्तांची संपूर्ण माहिती मिळेल व खरेदीचा निर्णय घेण्यास त्यांना मदत होईल. अशा प्रकारे एक अतिशय सुरळीत, सोपा घरखरेदीचा आभासी अनुभव त्यांना घेता येईल.’’
घर खरेदी करण्याचा निर्णय ग्राहकांना अगदी सहज घेता यावा, इतपत रिअल इस्टेट क्षेत्र प्रगल्भ होण्यासाठी, ‘रेरा’तर्फे नियमन केल्या जाणाऱ्या प्रकल्पांचा शोध घेता येईल’असे ‘ऑनलाईन डिस्कव्हरी प्लॅटफॉर्म’ सादर करण्याचे आदेश केंद्रिय गृहनिर्माण व नगरविकासखात्याने ‘क्रेडाई’ आणि ‘नरेडको’या रिअल इस्टेट क्षेत्रातील संघटनांना लखनऊ येथे 2019 मध्ये झालेल्या तिसर्या ‘रेरा कॉन्क्लेव्ह’मध्ये दिले होते.‘क्रेडाई आवास अॅप’हे विकसकांना त्यांचे तयार प्रकल्प जलद विकण्यात मदत करेल आणि घरखरेदीदारांची मानसिकता जोपासण्यास सहाय्यभूत ठरेल. प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासात्मक कार्याचे नेतृत्व करण्यास क्रेडाई कटिबद्ध आहे.
‘क्रेडाई’विषयी:
‘द कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स’ असोसिएशन ऑफ इंडिया’ (क्रेडाई) ही भारतातील खासगी स्थावर मालमत्ता विकसकांची सर्वोच्च संस्था अहे. 1999मध्ये तिची स्थापना झाली. देशभरातील 21 राज्ये आणि 220 शहरांमधील 20 हजारांहून अधिक विकसक या संघटनेचे प्रतिनिधित्व करतात. सरकारी प्रतिनिधी, धोरणकर्ते, गुंतवणूकदार यांच्याशी समन्वय साधून रिअल इस्टेट उद्योग अधिक सुसंघटित व प्रगतीशील होण्यासाठी ‘क्रेडाई’ने परिश्रम घेतले आहेत. रिअल इस्टेटमधील नैतिकतेची मानके व व्यवसाय पद्धती सुधारण्याच्या दिशेने क्रेडाई कार्य करते. केंद्र आणि राज्य सरकारांकडून ‘क्रेडाई’ला सर्व उपक्रमांमध्ये मान्यता मिळत असते.