पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत
दरमहा 500 रुपयांचे 3 महिन्यांसाठी सानुग्रह अनुदान
मुंबई, 3 एप्रिल :पंतप्रधान जनधन योजनेतील (पीएमजेडीवाय) महिला खातेदारांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांच्या काळात प्रत्येकी 500 रुपये जमा केले जातील, असे सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गेल्या 26 मार्च रोजी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान म्हणून ही रक्कम जाहीर केली आहे.
हे पैसे वैयक्तिक बँक खातेदारांना मिळतील. खातेधारकांना जवळच्या शाखेतून किंवा व्यवसाय प्रतिनिधींकडून हे पैसे काढता येतील. ते कधी काढायचे याबाबतचे संदेश त्यांना एसएमएस सुविधेतून पाठविण्यात येतील.
‘बँक ऑफ बडोदा’चे कार्यकारी संचालक विक्रमादित्यसिंग खिची म्हणाले, “पंतप्रधान जनधन योजनेतील महिला खातेदार या बहुतांशी दारिद्र्यरेषेखालील व तळागाळातील आहेत. त्यांना एटीएम वापरणे सोयीस्कर नसेल, हे लक्षात घेऊन बँकेने व्यावसायिक प्रतिनिधींना या कामी नेमले आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात या महिलांना हे पैसे मिळणे महत्त्वाचे आहे. कोविड-19 विषाणुच्या साथीमुळे या महिलांना बॅंकेतही जाणे शक्य नसल्याने,या लाभार्थ्यांना त्यांच्या सोईची आणि सुरक्षिततेची हमी देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. या खातेदारांना वेळेत, विनाव्यत्यय व सुरळीतपणे पैसे काढता यावेत, यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध करून ठेवावेत, अशा सूचना आमच्या सर्व शाखा व व्यवसाय प्रतिनिधींना देण्यात आलेल्या आहेत.”
सध्याच्या टाळेबंदीच्या काळात सरकारने दिलेल्या आदेशानुसार आणि शाखांमध्ये सामाजिक अंतर कायम ठेवण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. पैसे काढण्यासाठी जनधन योजनेतील खातेदारांची गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाने सुचविल्यानुसार, बँकेने खातेदारांना पैसे देण्याचे एक वेळापत्रक तयार केले आहे.
पंतप्रधान जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांचे पैसे काढण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –
या वेळापत्रकाचे पालन करण्यास एखाद्या खातेदाराला जमले नाही, तर तिने 9 एप्रिलनंतर बॅंकेची शाखा, व्यवसाय प्रतिनिधी किंवा एटीएम येथे संपर्क साधावा, असे आवाहन बॅंकेने केले आहे.