नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020 –होंडा समूहातील सर्व कंपन्यांचा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी विभाग असलेल्या होंडा इंडिया फाउंडेशनने आज भारतातील कोविड- 19 साथीविरोधात सुरू असलेल्या मदत कार्यासाठी 11 कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले आहे.
या मदतीचा एक भाग म्हणून होंडातर्फे तातडीने विविध सरकारी एजन्सीजना होंडा इंजिन बसवलेले तीव्र दाबाचे 2000 बॅकपॅक स्पेयर्स दिले जाणार आहेत. वजनाला हलके असलेले हे स्पेयर्स हॉस्पिटल, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे स्थाने, सार्वजनिक कँटीन्स आणि अशा इतर ठिकाणांचे जंतूनाशकांची फवारणी करण्यास अतिशय उपयोगी आहेत. होंडाने सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्यानिमित्ताने कोविड- 19 विरोधात देश करत असलेल्या प्रयत्नांसाठी वाहन उद्योगाच्या वतीने योगदान दिले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हात धुणे व इतर प्रयत्नांबरोबरच सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
त्याशिवाय होंडाद्वारे आपल्या उत्पादन कारखान्यांतून स्थानिक प्रशासनाला मदत केली जाणार आहे. होंडाने आपल्या सर्व उत्पादन कारखान्यांतील रुग्णवाहिका वैद्यकीय इमरजन्सीजसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच गरीब आणि वंचित समाजाला खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सचे वितरणही कंपनीतर्फे केले जात आहे.
कोविड- 19 साथीच्या भयानक परिणामांशी लढण्यासाठी होंडा इंडिया फाउंडेशनद्वारे केंद्रीय सरकार तसेच आपले उत्पादन कारखाने कार्यरत असलेल्या हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतील रिलीफ फंडासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याशिवाय भारतातील होंडाच्या 5 समूह कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी एकूण रिलीफ निधीमधअये आपल्या एका दिवसाचा पगार दान करण्याचे ठरवले आहे.
होंडा इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मिनोरू कातो म्हणाले, ‘कोविड- 19 साथीने देशात अनपेक्षित परिस्थिती निर्माण केली असून या घडीला समाजाच्या सर्व स्तरात एकत्र येण्याची गरज आहे. आर्थिक मदतीबरोबरच आम्ही तातडीने होंडा इंजिन बसवलेले तीव्र दाबाचे 2000 बॅकपॅक स्पेयर्स दान करणार असून त्यामुळे सार्वजनिक तसेच महत्त्वाच्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सरकारला मोठी मदत होईल. कोविड- 19 चा प्रसार रोखण्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.’
होंडा इंडिया फाउंडेशन (एचआयएफ) बद्दल
होंडा इंडिया फाउंडेशन (एचआयएफ) हा होंडा कार्स इंडिया लिमिटेड, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि., होंडा सिएल पॉवर प्रॉडक्ट्स लि., होंडा आर अँड डी (इंडिया) प्रा. लि. आणि होंडा अक्सेस इंडिया या सर्व होंडा समूह कंपन्यांचा सीएसआर विभाग आहे. या फाउंडेशनतर्फे रस्ते सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांच्याशी संबंधित सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. जगभरात समाजाला हवी असणारी कंपनी बनण्याचे होंडाचे ध्येय असून आपल्या सामाजिक योगदान उपक्रमांद्वारे जगभरातील लोकांना त्यांच्या आयुष्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घेण्याचा आनंद मिळवून देत शाश्वत समाजाची सेवा कंपनीला करायची आहे.