पीएम-केअर्स निधीमध्ये योगदान
– या कार्यात पुढाकार घेणारी देशातील पहिली पहिली शैक्षणिक संस्था
मुंबई : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) या शाळांचे नेटवर्क चालविणारी संस्था ग्लोबल स्कूल्स फाउंडेशन (जीएसएफ) हिने करोना व्हायरसविरोधातील राष्ट्रीय लढ्यात आपले योगदान देण्याकरीता ‘पंतप्रधान नागरिक मदत व आपत्कालीन सहाय्य निधी’साठी (पीएम-केअर्स फंड) दोन लाख सिंगापूर डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे.
या निधीचा उपयोग ‘कोविड-19’विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या स्त्रोतांना गती देण्यासाठी वापरला जाणार आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भारत आणि जगाच्या इतर भागात वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. ती लक्षात घेऊन तिच्यावर मात करण्याकरीता ‘जीआयआयएस’ने हे योगदान देऊ केले आहे.
‘ग्लोबल स्कूल फाउंडेशन’चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष अतुल टेमुर्णीकर म्हणाले, ‘’कोविड-19च्या साथीचा सर्व जगात उद्रेक झाला आहे. भारतातील अनेक नागरिकांना या आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे. समाजातील वंचित घटकांकडे या आजारावर मात करण्यासाठी पुरेसे आर्थिक स्त्रोत नाहीत. त्या दृष्टीने हा आजार आटोक्यात आणण्यासाठी तातडीने काही उपाययोजना कराव्या लागत आहेत. पंतप्रधानांच्या केअर फंडामध्ये योगदान देऊन ग्लोबल स्कूल फाउंडेशन या लढाईप्रति आपली कटिबद्धता व्यक्त करीत आहे. नागरिकांचे आरोग्य व त्यांचे कल्याण या दृष्टीने आमचे हे फक्त एक लहान पाऊल आहे.”
करोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यार्थ्यांना अखंडीत व सुरळीत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ‘जीआयआयएस इंडिया’ने आभासी वर्गखोल्यांची (व्हर्च्युअल क्लासरूम) सुविधा व इतर अनेक नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती वापरल्या आहेत. त्यायोगे विद्यार्थी घरातूनच शिक्षण घेऊ शकतील व स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील. ‘जीआयआयएस’ने आपले विद्यार्थी आणि शिक्षक यांना विषाणूची बाधा होऊ नये व त्याचवेळी त्यांचे शिक्षण देण्या-घेण्याचे कार्य सुरळीत सुरू राहावे यासाठी एक सातत्य योजना (कंटिन्युटी प्लॅन – सीपी) लागू केली आहे.
गेल्या अनेक वर्षांत, जीआयआयएस आणि जीएसएफ या संस्था विविध आदिवासी शाळा उपक्रमांमध्ये सक्रियपणे गुंतलेल्या आहेत. गुजरात राज्य सरकारच्या सहकार्याने चालविण्यात येणाऱ्या टिळकवाडा येथील महात्मा गांधी ग्लोबल इंडियन एकलव्य शाळेचा यात समावेश आहे.
‘ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल’बद्दल
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) या पारितोषिक विजेत्या शाळा सिंगापूरस्थित ग्लोबल स्कूल फाउंडेशनने स्थापन केल्या आहेत. 7 देशांमध्ये या शाळांचे 21 कॅम्पस आहेत. कौशल्य आधारित आणि विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रमासाठी नावाजलेल्या या जीआयआयएस शाळांमधून विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी देण्यात येतात.
शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जीआयआयएस शाळांना गेल्या 18 वर्षांच्या कालावधीत 140 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे. सुमारे 42 हून अधिक देशांतील विद्यार्थांनी ‘जीआयआयएस’च्या विविध शाळांमध्ये प्रवेश घेतलेले असल्याने ही एक बहुसांस्कृतिक शिक्षण संस्था झाली आहे.
शिक्षण आणि चारित्र्य विकासासाठी समग्र दृष्टीकोन स्वीकारण्यासाठी जीआयआयएस शाळांनी नव-रत्नांचे एक मॉडेल विकसीत केले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम आणि अनुभव, मानसिक आणि शारीरिक विकास, फाईन आर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्स, भाषा कौशल्ये आणि सर्जनशीलता, व्यक्तिमत्व विकास, नीतिशास्त्र आणि नैतिकता यांच्यात संतुलन साधण्यासाठी शाळेचे हे एक परिपूर्ण साधन आहे.