लखनौ: एरोस्पेस क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी पॅरामाऊंट ग्रुप आणि भारतातील आघाडीचा औद्योगिक समूह भारत फोर्ज यांनी धोरणात्मक भागीदारी केली आहे. ‘मेक इन इंडिया‘ अभियानामुळे भारतीय बाजारपेठेत आणि इतर देशांमध्ये निर्माण होत असलेल्या नवनवीन संधींचा लाभ घेण्याच्या उद्देशाने संरक्षण आणि एरोस्पेस प्रणालींच्या औद्योगिकीकरण आणि स्वदेशीकरणात या दोन्ही समूहांच्या टेक्नॉलॉजीज, क्षमता आणि नैपुण्ये यांचा एकत्रित वापर करण्यासाठी ही उच्च स्तरीय भागीदारी केली गेली आहे.
लखनौमध्ये आयोजित केल्या गेलेल्या डेफएक्सपो २०२० मध्ये या दोन्ही कंपन्यांनी दोन समझोता करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांमध्ये एरोस्पेस आणि स्पेशल प्रोटेक्टड वेहिकल्स क्षेत्रांमधील संधींना समाविष्ट करवून घेण्यात आले आहे.
या करारांनुसार पॅरामाऊंट ग्रुप आणि भारत फोर्ज हे दोन समूह संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादने, सेवा आणि प्रणालींची रचना, विकास, औद्योगिकीकरण आणि स्वदेशीकरणासाठी जागतिक पातळीवरील संधींचा लाभ घेण्यासाठी एकत्र येऊन काम करतील.
बीएफएलचे डिफेन्स आणि एरोस्पेसचे प्रेसिडेंट व सीईओ श्री. राजिंदर भाटिया यांनी सांगितले, “पॅरामाऊंट ग्रुप आणि भारत फोर्ज यांच्या अनेक क्षमता एकमेकांना अनुरूप आहेत. या भागीदारीमुळे आता हे दोन्ही समूह संरक्षण क्षेत्राच्या युद्धाशी संबंधित विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनले आहेत.”
पॅरामाऊंट ग्रुपचे ग्रुप चेअरमन इवोर इचिकोविट्झ यांनी सांगितले, “धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून संरक्षण औद्योगिक इको-सिस्टिम्स बनवणे हा पॅरामाऊंटच्या पोर्टेबल मॅन्युफॅक्चरिंग मॉडेलचा आधारस्तंभ आहे. मजबूत आणि दीर्घकालीन भागीदारीतून आमच्या संरक्षण आणि एरोस्पेस सिस्टिम टेक्नॉलॉजीज आणि सोल्युशन्सना विकसित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तंत्रज्ञान आणि कौशल्ये यांच्या देवाणघेवाणीतून स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे, संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या हाय व्हॅल्यू जॉब्समधून आर्थिक प्रगतीला गती देणे ही आमची नीती भारत फोर्जमध्ये देखील आढळून येते. अशा कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या संबंधित विभागांमध्ये उत्कृष्ट ताळमेळ असल्यामुळे नावीन्य, तंत्रज्ञान विकास आणि संरक्षण क्षमतांच्या स्वदेशीकरणाचा भक्कम पाया घातला जाऊ शकतो.”
डेफएक्सपो २०२० च्या हॉल क्रमांक ७ मध्ये बीएफएलच्या स्टॉलवर या दोन समूहांनी संयुक्तपणे कल्याणी एम4, 4X4 मल्टी-रोल आर्मर्ड प्रोटेक्टेड फाइटिंग वेहिकल आणि कल्याणी मेवरिक एटीसी – आर्मर्ड ट्रूप कॅरियर ही वाहने प्रदर्शित केली आहेत. अत्याधुनिक मोबिलिटी क्षमतांमुळे ही वाहने ५० किलोपर्यंत टीएनटी स्फोटकांच्या विस्फोटापासून सुरक्षा प्रदान करू शकतात.