~ ई–कॉमर्समधील महाकाय कंपनी अॅमेझॉन धागाची उत्पादने ‘अॅमेझॉन सहेली’ कार्यक्रमाअंतर्गत वेबसाइटवर ठेवणार ~
नवी दिल्ली : टाटा पॉवरचा स्त्री सक्षमीकरण उपक्रम ‘धागा’ आपल्या स्त्री उद्योजकांची कक्षा विस्तारून त्यांना भारतातील विस्तृत ऑनलाइन ग्राहकांपर्यंत नेण्यास सज्ज आहे. कंपनीने धागाच्या स्त्री उद्योजकांच्या व्यवसायाचा आवाका व व्याप्ती वाढवण्यासाठी अॅमेझॉन इंडियाशी सहयोग केला आहे. धागाची उत्पादने अॅमेझॉन इंडियामार्फत देशभरात सर्वांसमोर आणण्याचे व त्यांची विक्री करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.
‘अॅमेझॉन सहेली’ कार्यक्रम या वेबसाईटवरील डेडिकेटेड स्टोअरफ्रण्टचा भाग म्हणून धागाची उत्पादने प्रदर्शनास मांडली जातील. त्यामुळे स्त्रियांनी तयार केलेली ही उत्पादने अॅमेझॉनवरील विविध विभागांत सूचीबद्ध करून त्यांचे सादरीकरण व विक्री केली जाईल. आज धागा हा टाटा पॉवरचा नोंदणीकृत ट्रेडमार्कही आहे.
दोन कंपन्यांमधील सहयोगामुळे या स्त्रियांना अनेक सेवा व सहाय्यकारी यंत्रणा पुरवल्या जातील. त्यामुळे त्यांना आपली उत्पादने अधिक चांगल्या पद्धतीने विकता येतील. या सहयोगामुळे त्यांना ऑनबोर्डिंगच्या प्रक्रियेला वेग देण्यातही प्रशिक्षित संसाधनांमार्फत मदत केली जाईल. त्याचप्रमाणे इमेजिंग व कॅटलॉगिंग, उत्पादनाच्या याद्या तयार करणे यांत त्यांना मदत केली जाईल. रेफरल शुल्कात सवलत दिली जाईल आणि त्यांच्या खात्यांचे व्यवस्थापन मोफत करून दिले जाईल.
टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीर सिन्हा म्हणाले, “धागाच्या स्त्री सदस्यांना अतिरिक्त उत्पन्न पुरवणाऱ्या व त्याहून महत्त्वाचे म्हणजे भारतातील काही पारंपरिक कलाप्रकारांच्या जतनासाठी काम करणारी परिसंस्था निर्माण केल्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. आमच्यासोबत भागीदारी केल्याबद्दल मी अॅमेझॉन इंडियाचे आभार मानतो आणि या मार्गाने आमच्या महिला उद्योजकांच्या कक्षा विस्तारण्यात यश मिळावे अशी आशा व्यक्त करतो.”
“टाटा पॉवर धागा उपक्रम हा स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने योग्य कौशल्ये संपादन करण्यात मदत करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांचा सामाजिक–आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी बांधील आहे. आज धागा सदस्यांनी उदयोन्मुख उद्योजक होण्याची तसेच ग्राहकांप्रती बांधिलकी राखण्याची क्षमता दाखवून दिली आहे. त्यांच्या क्षमतांची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने अॅमेझॉनशी सहयोग हे या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे,” असे टाटा पॉवरच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स अँड सस्टेनेबिलिटी विभागाच्या प्रमुख शालिनी सिंग म्हणाल्या.
“टाटा पॉवरच्या ‘धागा’ उपक्रमाशी भागीदारी करता आली आणि त्यायोगे अॅमेझॉन सहेली कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्री उद्योजकांना ई–कॉमर्समध्ये प्रवेश करण्याची संधी देता आली याचा आम्हाला आनंद वाटतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही स्त्री उद्योजकांना अनोख्या पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचू देतो आणि जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स व फुलफिलमेंट सुविधांद्वारे त्यांच्या व्यवसायांना मदत करतो. गेल्या एक वर्षांत आम्ही या कार्यक्रमामध्ये १२०,००० स्त्री उद्योजकांची भर घातली आहे आणि धागाच्या सदस्यांचे यात स्वागत करून त्यांना उद्योजकतेच्या प्रवासात सहाय्य करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे अॅमेझॉन इंडियाच्या एमएसएमई एम्पॉवरमेंट आणि सेलर एक्स्पिरिअन्सचे प्रमुख श्री. प्रणव भसिन म्हणाले.
टाटा प्रोजेक्ट्स कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या (टीपीसीडीटी) सहयोगाने या भागीदारीच्या कक्षेत येणाऱ्या सर्व संभाव्य स्त्री उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. या सर्व स्त्री उद्योजकांकडे जीएसटी नोंदणी असेल आणि अॅमेझॉनवर विक्री करण्यास त्या पात्र असतील याची खातरजमा टीपीसीडीटी करेल.