दोन वर्षांत 1000 हून अधिक स्टार्ट-अपशी जोडले जाणार, टेलर-मेड बँकिंग उत्पादने देणार
मुंबई: बँक ऑफ बडोदा या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने स्टार्ट-अपसाठी पसंतीची बँकिंग पार्टनर बनण्यासाठी आणि येत्या दोन वर्षांत किमान 1000 स्टार्ट-अपशी जोडले जाण्यासाठी बडोदा स्टार्ट-अप बँकिंग कार्यक्रम दाखल केला आहे.
स्टार्ट-अप्समुळे रोजगारनिर्मिती होऊन आणि नावीन्य साधले जाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप व्यवस्था आहे, 15,000 हून अधिक स्टार्ट-अप्सना सरकारने मान्यता दिली आहे. येत्या काही वर्षांत 5,000 स्टार्ट-अप्सची वाढ होण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमांतर्गत, बडोदा स्टार्ट-अप ब्रँचेस विविध प्रकारची बँकिंग उत्पादने व सेवा सादर करणार असून त्यांची निर्मितीस्टार्ट-अप्सच्या विशेष बँकिंग गरजांच्या अनुषंगाने केली आहे. उत्पादनांमध्ये बँकेच्या सध्याच्या उत्पादनांबरोबरच, कस्टमाइज्ड स्टार्ट-अप करंट अकाउंट, अद्ययावत पेमेंट गेटवे, कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड व क्रेडिट सुविधा यांचा समावेश आहे.
बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयकुमार यांनी सांगितले, “स्टार्ट-अप्सच्या विशिष्ट गरजांबद्दल मार्केट रिसर्चमधून मिळालेल्या तपशिलाच्या अनुसार आम्ही हा कार्यक्रम तयार केला आहे.बडोदा स्टार्ट-अप ब्रँचेसमध्ये विशेष रिलेशनशिप मॅनेजर असतील आणि ते स्टार्ट-अप्सबरोबर भागीदारी करतील व त्यांना सहभागी करून घेतील. यामुळे सरकारच्या स्टार्ट-अप इंडिया योजनेतही योगदान दिले जाईल.”
सध्या, बँकेने गुरूग्राम, दिल्ली, नोएडा, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, पुणे व हैदराबाद अशा देशातील महत्त्वाच्या स्टार्ट-अप केंद्रांवर 10 स्टार्ट-अप ब्रँच सुरू केल्या आहेत. पुढील टप्प्यात, बँक लखनऊ, इंदोर, कोलकाता, कोची व चंडीगड येथे स्टार्ट-अप शाखा सुरू करणार आहे.
स्टार्ट-अप्ससाठी परिपूर्ण बँकिंग सेवा देण्याबरोबरच, स्टार्ट-अप्सना क्लाउड क्रेडिट, को-वर्किंग स्पेस, कायदेशीर/अकाउंटिंग सेवा व डिजिटल मार्केटिंग अशा अन्य सेवा देण्यासाठी बँकेने अशा सेवा देणाऱ्यांशी भागीदारी केली आहे.