Home Blog Page 3819

2017 पालिका निवडणूक- ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या सर्व पदाधिकारी नगरसेवकांची बैठक

0

पुणे :

2017 च्या पालिका निवडणुक तयारीसाठी विकासकामांचा आढावा आणि नियोजनासाठी पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’च्या वतीने मार्गदर्शनरपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक शहरातील सर्व नगरसेवक, शहर पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, निरीक्षक, विधानसभा अध्यक्ष, ब्लॉग अध्यक्ष, सेल अध्यक्ष अशा सर्वांसाठी एकत्रित रविवारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स टिळक रोड येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण, महापौर दत्ता धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष कर्णे गुरूजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महापौर धनकवडे यांनी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीविषयी पक्ष संघटनेला माहिती दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या,‘महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सभासद नोंदणीवर जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे. नगरसेवक कार्यकर्त्यांनी कशा दृष्टीने पुढील काळात काम केेले पाहिजे याविषयी विस्तृत चर्चा यावेळी करण्यात आली. महानगरपालिकेच्या विकास कामांचा आढावा आणि नियोजन, नगरसेवकांनी केलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कार्यकर्त्यांनीही केलेल्या सूचनाही विचारात घेण्यात आल्या.

संघटनात्मक बांधणीसाठी पुण्यात रा.स.प. चा मेळावा

0

पुणे :

सदस्यता नोंदणी आणि संघटनात्मक बाबींची चर्चा करण्यासाठी ‘राष्ट्रीय समाज पक्षा’चा राज्यस्तरीय मेळावा पुणे येथे घेण्यात आला. नित्यानंद सभागृह, सिंहगड रस्ता येथे झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा हे होते. उपाध्यक्ष दशरथ राऊत, महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी मार्गदर्शन केले.

पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख डॉ.उज्वला हाके यांनी महिलादिन कार्यक्रम आयोजनाची माहिती दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांच्या एप्रिल महिन्यात येत असलेला वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग खटके, पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातांब्रेकर, सर्व जिल्हाध्यक्ष, संपर्कप्रमुख, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

प्रशांत सरोदे क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी

0

1

पुणे – दि कॉन्फडरेशन ऑफ दि रियल इस्टेट डेव्हलपर्स क्रेडाई-महाराष्ट्र, या संघटनेच्या अध्यक्षपदी नागपूरचे बांधकाम व्यावसायिक प्रशांत सरोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हॉटेल वेस्टइन, पुणे येथे काल झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी  एकमताने सरोदे यांच्या नावाला सहमती दिली.  क्रेडाई महाराष्ट्रचे मावळते अध्यक्ष अनंत राजेगांवकर आणि क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर यांनी सरोदे यांच्या नावाची घोषणा सभेत केली.

 २०१५ -१७ या कालावधीसाठी संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची आणि ५ उपाध्यक्षांची नावेही जाहीर करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्षपदी – शांतीलाल कटारिया (पुणे) आणि उपाध्यक्षपदी राजीव पारेख  (कोल्हापूर) , प्रमोद खैरनार (औरंगाबाद), सुनील भायभंग (नाशिक) आणि शैलेश वानखेडे (अमरावती)  निवड करण्यात आली. नागपूर येथील महेश साधवानी यांची संघटनेच्या मानद सचिवपदी तर पुण्याचे अनुज भंडारी यांची मानद खजिनदारपदी आणि राजेश गांधी(सोलापूर),रसिक चव्हाण(नवी मुंबई), महिंद्र जैन(रत्नागिरी) यांची संघटनेच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली.

क्रेडाई महाराष्ट्र ही संपूर्ण महाराष्ट्रातील ३९ शहर शाखा असलेली शिखरसंस्था असून तिचे २६०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक सभासद आहेत. या शिखरसंस्थेत दर दोन वर्षानी नवीन अध्यक्षाची  निवड केली जाते.  बांधकाम क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवणाचे आणि त्यातून मार्ग काढण्याचे काम अनेक वर्ष ही संस्था करीत आहे.

‘आयएमईडी’च्या वतीने आयोजित ‘सी-गुगली 2015’ स्पर्धेची सांगता

0
1

पुणे :
‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) च्या ‘कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅण्ड सिस्टीम स्टडिज्’ विभागाच्या वतीने आयोजित ‘सी-गुगली-2015’ स्पर्धेची सांगता झाली. ही स्पर्धा आयएमईडी कॅम्पस, पौैड रोड येथे नुकतीच झाली. ही स्पर्धा आंतरमहाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे व पदव्युत्तर विद्यार्थि सहभागी झाले होते.
भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर आणि धनंजय गोखले working as a CATALYST in the field of project management ) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
प्रा. सत्यवान हेंबाडे, सुजाता मुळीक यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.  डॉ. अजित मोरे, प्रा. आर.व्हि.महाडीक, प्रा.एस.जोगळेकर, प्रा. पी. पवार, डॉ. एन. एन. महाजन, डॉ. एच. पाडळीकर आदी उपस्थित होते.
‘सी-गुगली-2015’ मध्ये डिव्हाईस एकत्र करणे, एसक्युएल लोडस्टर, डीए वीन-सी-कोड, लॅन गेमिंग (एनएफएस), प्रकल्प सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वडगाव खुर्द शाखेचे उद्घाटन

0
2

पुणे :
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वडगाव खुर्द शाखेचे आणि पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अलीकडेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष दशरथ राऊत, बाळासाहेब कोकरे, महासचिव बाळासाहेब दोडतले, पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडीप्रमुख डॉ. उज्ज्वला हाके, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर, सयाजी पाटील, संतोश बिचुकले, सचिन शेंडगे उपस्थित होते.

टिपू सुलतानची तलवार विजय मल्ल्या यांनी भारतात आणली … आता टिपू ची राम नामक अंगठी कोण भारतात आणणार ?

0

टायगर ऑफ म्‍हैसूर नावाने ओळखला जाणारा हैदराबादचा मुस्लिम राजा टीपू सुलतानची तलावार भारतामध्‍ये आणण्‍याची मागणी करण्‍यात आली होती. त्‍यावेळी उद्योगपती आणि राज्‍यसभेचे माजी खासदार विजय मल्‍याने इंग्‍लडमध्‍ये जाऊन हि तलवार खरेदी केली होती . म्‍हैसूर संस्थानाचा 18 व्या शतकातील राजा टिपू सुलतान ‘राम’ असे नाव कोरलेली अंगठी वापरत होता असा इतिहास आहे .१७९९ मध्ये  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या युद्धात मारला गेल्‍यानंतर राजा सुलतानच्‍या बोटातील अंगठी काढून घेण्‍यात आली. या ऐतिहासीक अंगठीचा 1.45 लाख पाउंड म्हणजेच 1.43 कोटी रुपयांत लंडनमध्‍ये गेल्या २०१४मध्ये  लिलाव करण्‍यात आला होता. लिलावात ही अंगठी ज्‍या व्‍यक्तिने खरेदी केली त्‍याचे नाव गुप्‍त ठेवण्‍यात आले होते. अलीकडे  ही अंगठी परत भारतात आणली जावी आशी मा‍गणी राज्‍यसभेत खासदार मुनव्वर सलीम यांनी केली आहे.
सेंट्रल लंडनच्या क्रिस्टी लिलावगृहाकडे असलेल्‍या माहितीनुसार या राम नामक टिपू सुलतानाच्या अंगठीचे वजन 41.2 ग्राम आहे. त्यावर देवनागरी लिपीत ‘राम’ नाव कोरले आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या युद्धात सन 1799 मध्ये र्शीरंगपट्टणममध्ये टिपूचा मृत्यू झाला होता. ड्यूक ऑफ वेर्लिगटन आर्थर बेलेसले नावाच्‍या व्‍यक्तिने त्यांच्या मृतदेह हाती लागल्यानंतर बोटातून ही अंगठी काढून घेतलेली होती, असे सांगण्‍यात येते. टिपू सुलतान यांना ‘टायगर ऑफ म्हैसूर’ या नावानेही ओळखले जाई. म्हैसूरचे सुलतान हैदर अली यांचे धाकटे पुत्र असलेले टिपू हे लढवय्या राजा, विद्वान व कवीही होते. अशा राजाचा ऐतिहासीक ठेवा देशात परत आणण्‍यासाठी राज्‍यसभेत प्रयत्‍न केला जात आहे.

‘व्हॉट अबाऊट सावरकर?’च्या टीमने कशी साजरी केली होळी… ?

0
3 4 5 2
अनिष्ट रुढींचे दहन करणाऱ्या होळीच्या सणानिमित्ताने ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या आगामी चित्रपटाच्या कलाकारांनी अनोखी होळी साजरी केली. पर्यावरणाचा ढासळता समतोल पाहता इको फ्रेंडली
होळीचा पर्याय अवलंबित या चित्रपटातील कलाकार अविनाश नारकर, अतुल तोडणकर, गणेश मयेकर आणि सारा श्रवण यांनी यावेळी केर-कचरा, झाडांचा पालापाचोळा, टाकाऊ कागद-पुठ्ठे यांचे दहन केले. तसेच समाजातील वाईट चालीरीतींचा बिमोड करीत राष्ट्राविकासासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञाही केली. सावरकरांच्या देशभक्तीपर विचारांनी प्रेरित पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचा संदेश देत ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ च्या ‘टीमने साजरी केलेली ही होळी सावरकरांसाठी मानवंदनाच ठरली.
रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब निर्मित ‘व्हॉट अबाऊट सावरकर? या चित्रपटामध्ये सावरकरांच्या विचाराने भारावलेल्या एका ध्येयवेडया तरुणाची कथा रेखाटण्यात आली आहे. रुपेश कटारे आणि नितीन गावडे दिग्दर्शित ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

अरविंद केजरीवाल सलग 10 ‍दिवस बेंगलोर निसर्गोपचार केंद्रात …

0

पुणे-
पूर्वी स्वारगेट जवळील डॉ . दत्ता कोहिनकर यांच्या विपश्यना केंद्रात आठ दिवस विपश्यना केलेले अरविंद केजरीवाल आता दहा दिवस बेंगलोर येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेणार आहेत. खोकला आणि मधुमेहावर उपचार करून घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल येथील जिंदाल निसर्गोपचार केंद्रात दाखल झाले आहेत. दहा दिवस ते या ठिकाणी उपचार घेणार आहेत.
गुरुवारी (ता. 5) दुपारी 12.30 वाजता देवनहळ्ळीनजीकच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. तेथून ते थेट तुमकूर रोडवरील जिंदाल निसर्गोपचार केंद्रात गेले. “आप‘च्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. शिष्टाचारानुसार त्यांच्यासाठी कर्नाटक सरकारने दोन मोटारींची व्यवस्था केली. मात्र, त्यांनी सरकारी मोटारीतून जाण्यास नकार देऊन कार्यकर्त्यांच्या मोटारीतून प्रवास केला. केजरीवाल यांचे आई-वडीलही बंगळुरात आले असून त्यांच्यासोबतच ते राहतील.
. शुक्रवारी (ता. 6) सकाळपासून त्यांच्यावर उपचारास प्रारंभ होईल. योगासन, प्राणायाम, माती, जलचिकित्सेसह विविध प्रकारचे उपचार त्यांच्यावर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्राच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. बबीना यांनी दिली आहे. दहा दिवसांत केजरीवाल यांचा खोकला कमी होईल, असे निश्‍चितपणे सांगणे कठीण आहे; पण दीर्घकालीन खोकला आणि मधुमेहावर नियंत्रणासाठी
जीवनपद्धतीत बदल करता येतो. त्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन त्यांना दिले जाणार असल्याचे डॉ. बबीना यांनी सांगितले.आयुर्वेदिक डॉक्टरांकडून केजरीवालांच्या काही तपासण्या करण्‍यात येतील. त्यानंतर केजरीवालांवर योगा, लॉफ थेरेपी, एक्युपंक्चर, जिम आणि फिजियोथेरेपीसारखी उपचार पद्धती वापरली जाईल. दरम्यान, उपचार सुरु असताना केजरीवाल यांना काही पथ्ये पाळावी लागणार आहेत. केजरीवालांवर पहाटे साडेपाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उपचार सुरु राहातील. या दरम्यान त्यांना चार तासांचा ब्रेक मिळेल. सायंकाळी उपचारानंतर ठीक सात वाजता केजरीवाल यांना जेवण करावे लागेल तसेच रात्री नऊ वाजता झोपावे लागेल. जिंदल नेचर केअर इन्स्टिट्यूटमध्ये उपचारादरम्यान केजरीवालांना पहिल्या आठवड्यात पालेभाज्या, व्हेजिटेबल सूप, ताजी फळे, ज्यूस आणि उकळलेल्या भाज्या खाण्‍यास दिल्या जातील. दुसर्‍या आठवड्यात नियमित जेवण दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांना बंगळुरात उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार केजरीवाल बंगळुरात दाखल झाले आहेत. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी सुमारे 110 जाहीर सभांना उद्देशून भाषणे केली होती. या काळात ऍलर्जीक खोकल्याचा त्रास त्यांना आणखीच जाणवू लागला. अखेर निसर्गोपचार घेण्याचे त्यांनी ठरविले. केजरीवाल यांच्या आगमनामुळे निसर्गोपचार केंद्र परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही परवानगीशिवाय केजरीवाल यांची भेट घेता येणार नसल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

“दगडी चाळीवरती चित्रपट करणे आव्हानात्मक होते”-दिग्दर्शक – चंद्रकांत कणसे

0

मुंबईतील भायखळ्यातील ‘दगडी चाळीवर’ चित्रपट करणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. एका जीवंत व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट करणे व त्या चाळीतील व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर उतरवणे हा माझ्या आयुष्यातील म्ह्त्वाचा टप्पा होता. असे सांगतायेत दिग्दर्शक चंद्रकांत कणसे………..

  करिअरची सुरवात कशी केली.

मला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मी शाळेत असताना शाळेतील बालनाट्यात आवडीने भाग घेत असे माझ्या करिअरची सुरवात शालेय नाटकापासून केली त्या नंतर मी टेलिव्हिजन मधून अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत आलो. अभिनेता म्हणून मी माझ्या करिअरमध्ये खूप चढ – उतार पाहिले. ‘सर आले धावून’, यदा कदाचीत, ‘आता होवून जाऊ द्या’ ही माझी नाटके विशेष लक्षात राहण्यासारखी. त्या बरोबर टी.व्ही. वरती मी सह – दिग्दर्शक म्हणून  गंगुबाई नॉन मेट्रिक ही माझी मालिका तर दिग्दर्शन म्हणून ‘अजून  ही  चांद रात आहे’, १७६० सासूबाई, ‘आभास हा’ या मालिका टेलिव्हिजन वरती  केल्या. माझ्या जीवनात संजय जाधव व राजेश देशपांडे या दोन व्यक्तींचे खूप मोठे स्थान असून ते माझे गुरु आहेत.

‘दगडी चाळ ’ चित्रपट दिग्दर्शनासाठी कसा मिळाला.

अभिनया बरोबरच मी सह – दिग्दर्शक म्हणून माझ्या करिअरला सुरवात केली. मी  संजय जाधव यांच्या सोबत फक्त लढ म्हणा, रिंगा रिंगा, दुनियादारी, प्यार वाली लव्ह स्टोरी असे चित्रपट केले. तसेच अंकुश चौधरी बरोबर ‘झक्कास’ हा चित्रपट केला होता. माझे काम पाहून अंकुश चौधरी याने माझे दिग्दर्शक म्हणून ‘दगडी चाळ’ ला नाव सुचवले आणि मला हा चित्रपट मिळाला.

 

तुमच्या चित्रपटाविषयी सांगा.

‘दगडी चाळ’ हा चित्रपट १९९५ – ९६ च्या गँग वॉरवरती भाष्य करणारा असला तरी या चित्रपटात छानसी लव्हस्टोरी असून एक चांगली कथा आहे. एका चाळीतील सामान्य कुटुंबातील तरुण काही कारणामुळे तो गुन्हेगारी क्षेत्राकडे ओळला जातो. त्यांनतर त्याच्या जीवनात झालेले बद्दल, त्याच्या जीवनात हळूवारपणे आलेले प्रेम त्यातून फुललेली प्रेम कथा  या गोष्टीवर या चित्रपटाचे कथानक बेतले आहे. या चित्रपटात दिग्ग्ज कलाकारांची फौज आपणास पहावयास मिळेल. या चित्रपटात दोन गीते असून एक गणपती तर  दुसरे प्रेम गीत आहे

तुमच्या चित्रपटाच्या कलाकार व तांत्रिक टीम विषयी सांगा.

या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, संजय खापरे, कमलेश सावंत व पूजा सावंत असे दिग्ग्ज कलाकार यात असून या चित्रपटात छायाचित्रण अनिकेत खंडागळे, कला दिग्दर्शक – मनोहर पाटील, संगीत – अमितराज, गीते – मंदार चोळकर, चित्रपटाचे लेखन – अजय ताम्हणे व प्रविण कमळे यांचे आहे  तर साईपूजा फिल्म एन्ड एन्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि सुरेश सावंत व अमोल काळे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्टात प्रदर्शित करण्यात येईल. असे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी सांगितले.

बेहिशेबी मालमत्तेबाबत नगरसेवकाविरुध्द गुन्हा दाखल

0

पुणे : महापालिकेतील राष्ट्रवादीचे सभागृह नेते सुभाष जगताप यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सहकारनगर पोलीस ठाण्यात बेहिशेबी मालमत्तेचा (अपसंपदा) गुन्हा दाखल केला आहे. जगताप यांच्या पत्नी उषा यांनाही आरोपी करण्यात आले असून तब्बल १ कोटी १२ हजार २१३ रुपयांची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हेमंत वासुदेव भट यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, जगताप यांच्याविरुद्ध एसीबीकडे २०१२मध्ये तक्रार अर्ज प्राप्त झाला होता.

त्याची चौकशी एसीबीमार्फत सुरू होती. ही चौकशी ३१ जुलै २०१४ रोजी बंद करण्यात आली. परंतु तक्रारदार रवींद्र बराटे यांनी जगताप यांच्याविरोधात ३० सप्टेंबर २०१४ रोजी पुन्हा तक्रार अर्ज दिला होता.

जगताप यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सादर केलेल्या शपथपत्राची छायांकित प्रत एसीबीकडे सादर करून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार एसीबीने त्याची पडताळणी केली आणि या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती.

नात्यांच्या पलिकडची मैत्रीची गोष्ट दिल दोस्ती दुनियादारी

0

2

झी मराठीवर ९ मार्चपासून सोम. ते शनि. रात्री १०.३० वा.

मैत्री म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं तसं अवघडच. मैत्रीचं नातं हे सर्व बंधनापलिकडचं असतं. त्याला वयाचं, अंतरांचं, जाती-धर्माचं, वर्णाचं, लिंगाचं असं कुठलंच बंधन नसतं. शाळेत, वर्गात, कॉलेजमध्ये, कट्यावर, कार्यालयात, कधी कधी तर प्रवासातही मैत्रीचे धागे जुळतात आणि घट्ट होतात. पण ही मैत्री ख-या अर्थाने तेव्हा अधिक बहरते जेव्हा आपण आपल्या घरापासून दूर असतो . शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर असणा-यांचं होस्टेल लाइफ’ किंवा पीजी लाइफ’ असं एक वेगळं विश्व तयार झालेलं असतं ज्यात सर्वार्थाने केंद्रस्थानी असते ती मैत्री. अशाच एका मैत्रीची आणि मित्रांची गोष्ट सांगणारा दिल दोस्ती दुनियादारी’ हा युथफुल कार्यक्रम झी मराठीवर दाखल होतोय येत्या मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता. ‘दुनियादारी’ फेम दिग्दर्शक आणि प्रसिद्ध छायादिग्दर्शक संजय जाधव यांच्या ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेव्हन या संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.

दिल दोस्ती दुनियादारीची कथा आहे घरापासून दूर राहणा-या सहा मित्र मैत्रिणींची. कैवल्य, आशुतोष, सुजय, अॅना, मीनल आणि रेश्मा असे हे सहा जण एकत्र आलेय स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत. यातील प्रत्येक जण वेगवेगळ्या उद्देशाने मुंबईत आलेला आहे. यात कुणाचा करिअरचा स्ट्रगल आहे तर कुणाचा काही तरी फॅमिली प्रॉब्लेम आणि हा स्ट्रगलच या सर्वांमधील एक समान धागा आहे. घरापासून आणि कुटुंबापासून दूर आलेल्या या सहा जणांचं एक नवं कुटुंब तयार झालं आहे ज्यात मैत्री, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि सोबतच धम्माल, मजा मस्तीही आहे. यातील प्रत्येकाने उराशी जोपासलंय एक स्वप्न. विविध स्तरातून आणि पार्श्वभूमीतून आलेला हा प्रत्येकजण आपापली स्वप्नं साकार करण्यासाठी या शहरात आलाय जिथे पावलापावलावर आहेत नवे अडथळे, नवी आव्हाने आणि नवे संघर्ष. या संघर्षांना  एकमेकांच्या साथीने तोंड देत सगळे निघालेयत अंतिम ध्येयाच्या दिशेने. काय आहेत त्यांची स्वप्नं ? आणि काय आहेत त्यांची आव्हाने? याची गोष्ट बघायला मिळणार आहे दिल दोस्ती दुनियादारी’ मध्ये.

मराठी मालिकांच्या विश्वात कायम काही तरी नवीन आणि दर्जेदार कथा देणा-या झी मराठी वाहिनीवरून ही ‘फ्रेश’ विषयावरची मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विषयासोबतच यात नाविन्य आहे ते यातील कलाकारांचं. यातील सहाही व्यक्तिरेखांसाठी अतिशय फ्रेश चेह-यांची निवड करण्यात आली आहे. अमेय वाघ, सुव्रत जोशी, पुष्कर चिरपुटकर, सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर अशी नव्या दमाची कलाकार मंडळी या मालिकेत बघायला मिळणार आहे. मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन आणि छायांकन करणारे संजय जाधव यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. तर ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेचे दिग्दर्शन करणारे विनोद लव्हेकर यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. संजय जाधव आणि आशिष पाथरे यांची कथा आहे तर आशिषच्या सोबतीने मनस्विनी लता रविंद्र यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.

आजच्या तरूणाईची गोष्ट त्यांच्याच भाषेत मांडणारी ही मालिका युथफुल असली तरी ती सर्व प्रेक्षकांचा विचार करून बनवली आहे त्यामुळे ती सर्वांनाच आवडेल अशी झालीये. नात्यांच्या पलिकडची मैत्रीची ही गोष्ट दिल दोस्ती दुनियादारी’ दाखल होतेय येत्या मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त झी मराठीवर.

नव्या प्रदेशाध्यक्ष नियुक्तीनंतर कॉंग्रेस भवनमध्ये नव्या शहराध्यक्षाचे वेध

0

पुणे – कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार अशोक चव्हाण यांच्या नियुक्तीचे शहरात वृत्त धडकताच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कॉंग्रेस भवनच्या प्रांगणात सोमवारी जल्लोष केला. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या शहरातील उमेदवारांचा पराभव झाल्यावर अभय छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पर्यायी नियुक्ती न झाल्यामुळे त्यांच्याकडेच प्रभारी सूत्रे सोपविण्यात आली होती. प्रदेशाध्यक्षांची आता नियुक्ती झाल्यामुळे शहराध्यक्ष केव्हा निवडले जातात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. तसेच इच्छुकांनी शहराध्यक्षपद मिळावे, यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत.
खासदार चव्हाण यांच्या नियुक्तीचे आम्ही स्वागत करतो. तसेच त्यांची नियुक्ती केल्याबद्दल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करतो, असे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी म्हटले आहे. चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे पक्ष आणखी भक्कम होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय मजदूर संघातर्फे अध्यक्ष सुनील शिंदे यांनीही प्रदेशाध्यक्ष निवडीचे नियुक्तीचे स्वागत केले आहे. नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले, ‘चव्हाण हे तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षसंघटना आणखी भक्कम करतील. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाला राज्यात पुन्हा वैभवाचे दिवस चव्हाण आणतील.‘‘ या वेळी झालेल्या जल्लोषात प्रदेश कॉंग्रेस समितीचे प्रवक्ते रमेश अय्यर, शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस विठ्ठल थोरात तसेच नीलेश बोराटे, अंजनी निम्हण, लतेंद्र भिंगारे, सुनील घाडगे, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, सुजीत यादव, सुरेखा खंडागळे, सादिक लुकडे, मीरा शिंदे, प्रगती कांबळे, दयानंद अडागळे, प्रा. वाल्मीक जगताप, बबलू सय्यद, अमीन शेख, रोहित अवचिते आदी सहभागी झाले होते.

मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये लावणे बंधनकारक करणार – तावडे

0

पुणे : ज्या वेळी इतर चित्रपट नसतात, त्या वेळी मराठी चित्रपट लावणे आणि चित्रपटांचा प्राइम टाइम सोडून इतर वेळ मराठी चित्रपटांना देणे, ही पद्धत बंद करून मराठी चित्रपटच मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये लावणे बंधनकारक करायचा विचार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने सोमवारी कलावंत आर्थिक साह्य योजेनेचा कार्यक्रम घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, सतीश रणदिवे, विजय कोंडके, रामदास फुटाणे उपस्थित होते. या वेळी शरद वर्तके, दत्तोबा भडाळे, सुधा माने, शशिकला जाधव, राजाराम जाधव, रमाकांत सांगलीकर आदी कलाकार तसेच निर्मिती व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्यांना धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

तावडे म्हणाले, ‘‘स्वत:चे आयुष्य पूर्णत: कलेला समर्पित केलेल्यांचा सन्मान कोणत्याही मंत्र्यांच्या हस्ते करण्यापेक्षा त्यातील जाणकाराने केला, तर केवळ त्या कलेचाच नाही, तर कलाकाराचादेखील सन्मान होतो. कलेला राजकारण्यांपेक्षा राजाश्रय मिळायला पाहिजे.’’

मिळणाऱ्या मानधनापैकी खूप कमी वाटा कलाकारांपर्यंत पोहोचतो, अशी खंत व्यक्त करून कांबीकर म्हणाल्या, ‘‘आज चित्रपटांना व कलाकारांना चांगले दिवस आले आहेत; परंतु जुने कलाकार हलाखीतच जीवन जगत आहेत. काहींना सांभाळणारे कोणी नाही, तर काहींना वयामुळे आता कष्ट होत नाहीत. अशा व्यवहारी जगात असा सन्मान महत्त्वाचे आहे.’’ मेघराज राजेभोसले यांनी प्रास्ताविक केले

फाळके चित्रनगरीत ‘एमएसडी’

0

पुणे : महाराष्ट्राला रंगभूमीची परंपरा आहे. रंगभूमीची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी शासन बांधील आहे. सध्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) माध्यमातून ती चालवण्यास दिली जाणार आहे. या चित्रनगरीत एनएसडीच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामा (एमएसडी) संस्था सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी येथे केली.

राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’, तर प्रसिद्ध नाट्यसंगीत गायिका कीर्ती शिलेदार यांना ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात माजी नाट्य संमेलनाध्यक्ष अरुण काकडे आणि ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. शासनातर्फे वृद्ध कलाकारांना देण्यात येणाऱ्या आॅनलाईन अनुदान उपक्रमाचा या वेळी शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, सांस्कृतिक संचालनालयाचे उपसचिव संजय भोकरे, विजया पणशीकर उपस्थित होत्या.

तावडे म्हणाले, ‘‘या चित्रनगरीमध्ये नूतनीकरणाचा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी २२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या ठिकाणी एमएसडी उभारण्याबरोबरच देशविदेशातील अनेक नाटके रसिकांना पहाता येतील.’’ राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगभूमीचे प्रशिक्षण मिळण्यासाठी सुसज्ज असे हॉस्टेल विकसित केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हॉस्टेलमध्ये २५० विद्यार्थ्यांची व्यवस्था होईल.’’ सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक अजय आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. सौरभ गोडबोले आणि नूपुर चितळे यांनी सूत्रसंचालन केले.

अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष- संजय निरुपम यांच्याकडे मुंबई काँग्रेसची धुरा

0

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात सोमवारी पहिल्यांदाच मोठे फेरबदल करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या जागी अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली. मुंबई काँग्रेसची धुरा माजी खासदार संजय निरुपम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्याने पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी लक्षणीय खांदेपालट केले आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत तर अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले तर त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसच्या पारड्यात ४२ जागा पडल्या होत्या. त्यामुळे ठाकरेंविरोधात पक्षातील काही नेत्यांनी मोर्चा उघडला होता; परंतु त्याकडे वारंवार हायकमांडने दुर्लक्ष करत नेतृत्व बदल करण्यास टाळले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नारायण राणे, डॉ. नितीन राऊत, बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी नावे चर्चेत होती. मात्र, ‘पेड न्यूज’ प्रकरणाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर तसेच बहुचर्चित ‘आदर्श’ घोटाळय़ामुळे मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्याने त्यांच्या माथी असलेले ग्रहण काही केल्या सुटे ना झाले होते. तेव्हापासून चव्हाण यांच्याकडे पक्षाने महत्त्वाची कुठलीही जबाबदारी सोपवली नव्हती. गांधी घराण्याशी निष्ठावंत असलेले चव्हाण यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून हायकमांडची द्विधा मन:स्थिती राहिली. निवडणुकीच्या काळात देखील त्यांना बाजूला ठेवण्यात आले होते; परंतु गेल्या काही दिवसांत न्यायालयाकडून चव्हाण यांना मिळालेला दिलासा तसेच लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी विजश्री खेचून आणत पक्षश्रेष्ठींचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यात यशस्वी झाले. अखेर त्यांचे उत्तम संघटनकौशल्य ध्यानात घेता काँग्रेसने त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकली. चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भक्कम स्थान पाहता पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाने त्यांना संघटनेत परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तर भारतीय समाजाचा चेहरा असणारे संजय निरुपम यांची वर्णी लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचा विचार करता उत्तर भारतीय समाजाचा चेहरा असलेल्या संजय निरुपम यांच्याकडे पक्षाने मुंबई अध्यक्षपदाचा पदभार सोपवला आहे. महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवायचे असल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतांची निर्णायक भूमिका लक्षात घेता, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय समाजात लोकप्रिय असणार्‍या आणि आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध असणारे संजय निरुपम यांनी आपण येणार्‍या काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष मुंबईत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारेल, अशा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.