Home Blog Page 2213

शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार

0

मुंबई, दि. 11 : सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजिटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित केला असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थिती यासाठी गुण देण्यात येणार आहेत. यादृष्टीने राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये ही उपस्थिती नोंदविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून यामध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच अनुपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. या ॲपमुळे विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही, असे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रामाणिक करदात्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम-डॉ. भागवत कराड

0

पुणे : “शासन, करदाता आणि कर सल्लागार यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे वस्तू आणि सेवा कर संकलन चांगले होत आहे. प्रामाणिक करदाता अर्थव्यवस्थेचा कणा, तर कर सल्लागार हा शासन आणि करदाता यांना जोडणारा दुवा आहे. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए), ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (जीएसटीपीएएम) आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआयएफटीपी’च्या ४५ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘ज्ञानसंगम २०२१’ या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे उद्घाटन डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाले.
अमनोरा फर्न क्लब येथे झालेल्या या परिषदेवेळी ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, परिषदेचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, ‘एआयएफटीपी’चे एम. श्रीनिवासा राव, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, एस. एस. सत्यनारायण, मुख्य सहसमन्वयक शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी सीए योगेश इंगळे लिखित ‘जीएसटी शास्त्र’, स्वप्नील शाह लिखित ‘जीएसटी ऑन सर्व्हिस सेक्टर’ व सीए वैशाली खर्डे लिखित ‘अ प्रॅक्टिकल गाईड ऑन जीएसटी ऍक्ट’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन कराड यांच्या हस्ते झाले. वृंदावन शहा व जयरामन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तत्पूर्वी मंथन सत्रात ‘कनॉन्स ऑफ जस्टीस : सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, टॅक्स ट्रिब्युनल’वर मुंबईतील ऍड. लक्ष्मीकुमारण, ‘रोल ऑफ अलाइड लॉज इन इंटरप्रेटेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी लॉ’वर दिल्ली येथील ऍड. जे. के. मित्तल आणि जयपूर येथील ऍड. पंकज घिया, तर मानसिक तणाव यावर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मार्गदर्शन केले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

डॉ. भागवत कराड म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचावी, याचा प्रयत्न करत आहेत. विकासाच्या योजना राबविण्यात कर हा घटक महत्वाचा असून, कर प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी कर सल्लागारांनी सूचना पाठवाव्यात. अर्थ मंत्रालयाकडून कर प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनानंतर अर्थसाखळी पूर्ववत होत आहे. लोकांमध्ये डिजिटल आर्थिक व्यवहार, अर्थ साक्षरता आणि आर्थिक सर्वसमावेशकता या तीन गोष्टींवर काम करायला हवे. डिजिटल अर्थव्यवहारात वाढ झाली, तर प्रामाणिकता आणखी वाढेल.”

सतीश मगर म्हणाले, “कर प्रणालीत मोठे बदल होताहेत. पण कर भरताना काही अडचणी येतात. जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्राला, तसेच ग्राहकांनाही फटका बसला आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहेत. या प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यवसाय नीटपणे करता यावा, यासाठी अर्थ मंत्रालयाचा पुढाकार महत्वाचा आहे.”

श्रीनिवासा राव यांनीही मनोगत व्यक्त केले. नरेंद्र सोनवणे यांनी स्वागत प्रस्ताविक केले. अनुज चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. शरद सूर्यवंशी यांनी आभार मानले.

मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन

0

पुणे- शहर जिल्हा काँग्रेंस कमिटीतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

     यावेळी मौलाना आझाद यांना आदरांजली वाहताना शहराध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, शहर उपाध्यक्ष ॲड. शाबिर खान  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  

     यावेळी नगरसेवक रफिक शेख, पुणे शहर अल्पसंख्याक अध्यक्ष यासीन शेख, डॉ. अनिस खान, सुलतान खान, निसार खान, अकबर शेख, सेल्वराज ॲन्थोनी, सलीम मुल्ला, ज्योती परदेशी, ॲड. विठ्ठल राठोड, देविदास लोणकर, फैय्याज शेख, अविनाश बहिरट, आयशा शेख, मीना गायकवाड, योगिता साळवे, आकाश चव्‍हाण, संजय लांडगे,  शहनवाज शेख, ॲन्थोनी दास, आदी उपस्थित, मोनिका पठारे, हारून शेख होते.

अन्यथा ठाकरे सरकारला सळो की पळो करू-आ. शिरोळे यांचा इशारा

0

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना माझा पाठिंबा असून त्यांच्या मागण्यांबाबत ठाकरे सरकारने न्याय्य तोडगा लवकर काढावा अन्यथा सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज बुधवारी दिला.

शिवाजीनगर एस.टी.आगार येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आमदार शिरोळे बुधवारी सहभागी झाले आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. कर्मचाऱ्यांनी आत्महत्त्येचा विचार मनातही आणू नये. ही लढाई धैर्याने लढायची आहे, असे आवाहन आ. शिरोळे यांनी केले. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हेकेखोरपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळला आणि अनेक कर्मचाऱ्यांनी जीव गमावले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे महाराष्ट्रातील गांवे, शहरे जोडली गेली. गावांचा विकास झाला, घराघरातील नातेसंबंध अतूट राहिले. प्रत्येकाने कधी ना कधीतरी लालपरीतून प्रवास केलाच असेल. आता या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी सर्वांनी उभे राहाण्याची वेळ आली आहे, असे आवाहन आमदार शिरोळे यांनी केले.

यावेळी शिवाजीनगर मतदारसंघ भाजप अध्यक्ष रविंद्र साळेगांवकर, सुनील पांडे, प्रतुल जागडे, गणेश बगाडे, आनंद छाजेड तसेच शिवाजीनगर मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

जंगली महाराज मंदिर सुधारणेसाठी ५०लाखाचा निधी हवा-आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे – येथील सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर सुधारणेसाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून ५०लाखाचा निधी मिळावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ असलेल्या श्री सद्गुरु जंगली महाराज मंदिर याच्या विकासासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीने २०२२-२३ च्या अंदाजपत्रकातून निधी उपलब्ध करावा. मंदिरातील सभामंडप आणि मुख्य प्रवेशद्वार यांचे जतन व्हावे आणि दर्जा वाढावा याकरिता २५लाख आणि दगडी पेव्हिग ब्लॉक करणे, दगडी टप्पा करणे, स्टेनलेस स्टील रेलिंग करणे, मंदिर परिसरात भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे आदी सुविधांसाठी २५लाख असे एकूण ५०लाख रुपये निधीची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जंगली महाराज मंदिर हे पुण्यातील पुरातन ठेवा आहे आणि महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. मंदिरात नित्य धार्मिक कार्यक्रम होत असतात. उत्सवही मोठ्या प्रमाणात होतो. उत्सव काळात गायन, वादन, व्याख्याने असे लोकप्रिय कार्यक्रम होतात. मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून परिसर रमणीय आहे. त्याचे जतन व्हावे अशी अनेक भाविकांची मागणी असल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले

सैनिकांच्या कुटुंबांची तरी महापालिकेने थट्टा करू नये

0

सैनिकांची कुटुंबे पुणे महापालिकेच्या कारभारावर नाराज , म्हणाले आमची तरी फसगत करू नका -पीसीएमसी कडून काही शिकावे

पुणे- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने माजी सैनिक किंवा त्यांच्या विधवा पत्नी यांना मिळकत करातून माफी देण्याचा प्रस्ताव तर महापालिकेने संमत केला पण त्याची अंमलबजावणी कुठे झाली ? पुढे त्याची अंमलबजावणी का होत नाही ? असे सवाल करत किमान माजी सैनिकांच्या भावनांशी तरी खेळू नका आणि तेही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या योजनेद्वारे असे वागणे बरे नव्हे असा सल्ला आता पुणे महापालिकेला सैनिकांच्या कुटुंबांकडून दिला जातोय .

राज्य शासनाने आणि महापालीकेने माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नींना मिळकत करातून माफी देण्याचा .. म्हणजेच त्यांना मिळकत कर आकारू नये असा निर्णय घेतला आहे . या संदर्भात पुण्यातील माजी सैनिकांच्या संस्था , संघटना आणि अनेक माजी सैनिक आणि त्यांची कुटुंबे महापालिकेला वारंवार विनंती करत आहेत . ठराव तर केला मग आता कर कशाला भरायला लावता , अखेरीस अनेकांनी नाका पेक्षा मोती जड होऊ नये म्हणून कर भरला देखील . अशी पुण्यात स्थिती असताना सोल्जर्स इंडिपेंडंट रीहैब्लीटेशन फौंडेशन (सिर्फ ) चे असे म्हणणे आहे कि,’आमच्या संथेने पुणे महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला .पण महपालिकेच्या ढम्म प्रशासनाने काही दाद दिली नाही . सीमेवर शत्रूला हैराण करणाऱ्यांना आता महापालिका प्रशासनाने हुलकावण्या देऊ नये .या निर्णयाने सुमारे पुण्यातील २० हजार मिळकतदारांना दिलासा मिळणार आहे. २०२१ हे वर्ष केंद्र शासनाने १९७१ च्या युद्धातील भारतीय सैन्याने प्राप्त केलेल्या अभूतपूर्व विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने सैन्यदलाचा सन्मान , कृतज्ञता व्यक्त करण्याचे निश्चित केलेले आहे . या अंतर्गत असलेल्या या उपक्रमास फक्त पुणे महापालिकाच अपवाद असावी .पुण्यालाग्त च्या पिंपरी महापालिकेने या प्रस्तावाची अंमलबजावणी कधीच सुरु केलेली आहे. महाराष्ट्रातील ९९ टक्के ग्रामपंचायती, नगरपालिका यांनी त्यांचे अनुसरण केले आहे .पुण्यात एकूण १६ महत्वाच्या सैनिकी अस्थापना असून हि त्यांच्या प्रती पुणे महापालिकेने दाखविलेले औदासिन्य खेदजनक आहे. साळुंके विहार येथील आर्मी वेल्फेअर को ऑप. हौसिंग सोसायटी ने महापालिकेशी असंख्य वेळा पत्र व्यवहार केला . आश्चर्याची बाब म्हणजे साधा प्रतिसाद देऊनही दाखल महापाल्केने घेतली नाही . आता या पुढे निवडणूक कामकाजाचे किंवा आचारसंहितेचे कारण दिले जाऊ शकते .त्यापूर्वीच ज्यांनी कर भरला आहे त्यांना परतावा द्यावा अथवा पुढील बिलात त्यांची रक्कम वळती करावी आणि अन्य सैनिकांना मिळकतीची सुधारित कर आकारण्यात येत नसल्याची बिले वाटप करावीत अशी मागणी सिर्फ ने केली आहे .

कोकणातील सहा प्रकल्पांच्या निविदा विखंडनाचे आदेश रद्द

0

मुंबई-कोकण विभागातील सहा प्रकल्पांमधील यापुर्वीचे निविदा विखंडनाचे आदेश रद्द करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या अनुषंगाने 30 ऑगस्ट 2016 रोजी घेतलेला निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोकण विभागातील शिरशिंगे, शाई, सुसरी, चणेरा, जामदा व काळ या सहा प्रकल्पाच्या निविदेप्रक्रियेत कथित गैरप्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु होती. ती नंतर बंद करण्यात आली होती.
उच्च न्यायालयाने विविध याचिकांशी संबंधित 8 जून 2021 रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी खालील प्रमाणे अटी व शर्ती राहतील. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या सक्षम अधिकाऱ्याने स्वयंस्पष्ट आदेश द्यावेत. प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या विविध टप्प्यांवर झालेल्या अनियमितता गृहित धरता येणार नाही. या प्रकल्पांबाबत चालू असलेल्या अथवा प्रस्तावित विभागीय चौकशीची कार्यवाही पूढे सुरू राहील. या निर्णयामुळे विभागीय चौकशीस बाधा पोहोचणार नाही.
विहित कार्यपध्दतीनूसार मंजुरीशिवाय अतिरिक्त निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही. निविदांची कामे प्राधान्याने पूर्ण करून पाणी साठ्याचा जास्तीत जास्त लाभ होईल अशाप्रकारे उर्वरित कामांचे योग्य नियोजन करून अंमलबजावणीची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची राहील. तसेच केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाच्या वन (संवर्धन) अधिनियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

मुंबई महापालिकेच्या-नगरसेवकांची संख्या 236 होणार

0

मुंबई-बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या 236 अशी होणार आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम 5 मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहीली. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये 3.87 टक्के इतकी वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 236 अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

अतिरिक्त विकास आयुक्त पद निर्माण करण्यास मान्यता

उद्योग संचालनालयात अतिरिक्त विकास आयुक्त हे पद निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

उद्योग संचालनालयात गेल्या 6-7 वर्षात कामकाज वाढले असून कृषी व अन्न प्रक्रीया धोरण राबविणे, निर्यात प्रचलन धोरणाची अंमलबजावणी करणे, मैत्री कक्षाचे कामकाज अधिक गतीमान करणे, उद्योगांचे प्रश्न मार्गी लावणे अशा कामांसाठी या पदावर जबाबदारी सोपविण्यात येईल.
हे पद भारतीय प्रशासन सेवेतील रु.37400-67000+ग्रेड पे 8700 या वेतनश्रेणीतील संवर्गबाह्य पद असेल.

३ हजार ८६० जणांच्या रक्तदानाने महापौरांचा वाढदिवस साजरा

0

लेकीसह महापौरांकडूनही रक्तदानाने साद !

पुणे-शहरातील रक्त पिशव्यांचा तुटवडा लक्षात घेता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वाढदिवसदिनी रक्तदान महासंकल्प दिवस आयोजित करत पुणेकरांना रक्तदान करुन शुभेच्छा देण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या या आवाहनावर रक्तदानासाठी पुणेकर एकवटल्याचे चित्र दिसले. वाढदिवसदिनी दिवसभरात तब्बल ३ हजार ८६० रक्तदात्यांनी महापौरांना रक्तदानरुपी शुभेच्छा दिल्या.

महापौर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुणेकरांना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शिबिरात विविध १९ रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी या शिबिराला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे,आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,मनसे शहराध्यक्ष वसंतजी मोरे,आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह नगरसेवक, भाजप पक्षपदाधिकारी, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

रक्तदानाच्या आवाहनाला पुणेकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणेकर एकत्र आले तर काय करु शकतात? हे कोरोना संकटाचा सामना करताना दिसून आले होते. सद्यस्थितीत शहरात रक्ताचा तुटवडा असताना पुणेकरांनी रक्तदानासाठी दाखवलेली एकजूट समाधान देणारी होती. ३ हजार ८०० पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदानरुपी दिलेल्या शुभेच्छा नजीकच्या गरजूंना जीवनदान देणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. रक्तदान करणाऱ्या सर्व पुणेकरांचा मी ऋणी आहे. अनेकांना इच्छा असूनही वैद्यकीय कारणांनी रक्तदान करता आले नाही. त्यांनी प्रत्यक्ष उपक्रमाला भेट देऊन दिलेल्या शुभेच्छाही महत्त्वाच्या होत्या.

शिबिराच्या आयोजनाबद्दल माहिती देताना संस्कृती प्रतिष्ठानचे सचिव निलेश कोंढाळकर म्हणाले, ‘रक्तदानाच्या आवाहनानंतर रक्तदात्यांचा प्रतिसाद लक्षात घेता रक्तपेढ्यांची संख्या १९ पर्यंत वाढवण्यात आली. रक्तदान प्रक्रियेत सुलभता ठेऊन कमी वेळात जास्तीत जास्त दात्यांना सहभागी होता येईल, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच दात्यांची संख्या ३ हजार ८०० पेक्षा जास्त झाली’

रक्तदानाचा उपक्रम लोकोपयोगी : चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच सेवा उपक्रमावर भर देण्याचा आग्रह धरतात. त्यालाच अनुसरून महापौर मोहोळ यांनी वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको रक्तदान करा, असे आवाहन केले. त्या आवाहनाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आण्णांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल, त्यांचे भाजपा परिवाराच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन.‌ भविष्यातदेखील त्यांनी असेच लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, यासाठी शुभेच्छा, अशी भावना यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केली.

लेकीसह महापौरांकडून रक्तदान !

रक्तदान शिबिराची सुरुवात महापौर मुरलीधर मोहोळ यांची कन्या सिद्धी हिच्या आणि स्वतः महापौरांच्या रक्तदानाने करण्यात आली. त्यानंतर दिवसभर रक्तदात्यांनी रक्तदान करत महापौरांना शुभेच्छा दिल्या. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या रक्तदानाची सांगता रात्री १०:३० वाजता करण्यात आली.

नवाब मलिकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन; मुंबई भाजपचा आक्रमक पवित्रा!

0

मुंबई- अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या आरोपामुळे मुंबई सह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. मुंबई भाजपाकडून नरिमन पॉइंट येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय परिसरात कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं. नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली. भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तिघाडी सरकारच्या खोट्या मंत्र्याचा जाहीर निषेध! अश्या घोषणा,मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात देत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय परिसर दणाणून सोडला. त्यावेळी मंगलजी म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व त्यांच्या कुंटुबावर मंत्री नवाब मलिक बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांचा हा अपमान भाजपचा कोणताही कार्यकर्ता सहन करू शकत नाही. एक महिन्यापासुन राजकीय पक्षातील नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर नवाब मलिक सोशल मीडीया व प्रसार माध्यामाच्या माध्यमांतून खोटे व तथ्यहीन आरोप करत असुन हे राजकारणाला काळीमा फासणारे कृत्य आहे अशी टीका मंगल लोढा यांनी केली. यावेळी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, आमदार राहुल नार्वेकर, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, भायखळा विधानसभा मंडल अध्यक्ष नितीन बनकर तसेच इतर भाजपा नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, बियांचा व समाजाचा आहे – पद्मश्री राहीबाई पोपरे

0

नवी दिल्ली 10 : पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या सत्कारासमयी व्यक्त केल्या.

मंगळवारी सायंकाळी ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांनी परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. परिचय केंद्राच्या जनसपंर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्राीमती पोपरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ इन्स्टीट‌्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहूड ॲण्ड डेव्हलपमेंटचे विशेष तज्ज्ञ संजय पाटील, विभागीय अधिकारी जितीन साठे, योगेश नवले आणि लक्ष्मण डगळे सोबत होते. माहिती अधिकारी अंजु‍ निमसरकार यांच्या सह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सोमवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राहीबाई पोपरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  श्रीमती पोपरे यांनी आतापर्यंत 54 पिकांच्या 116 वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे.

प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्लच्या प्रतिक्रिया देताना श्रीमती  पोपरे म्हणाल्या, हा पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, माझ्या बीयांचा, निसर्गाचा आणि आपल्या समाजाचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या.  मागील 25 वर्षांपासून देशी बीया घरी जतन करत असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती जगाला व्हावी म्हणून बायफ संस्थेची मोठी मदत झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच गावपातळीवर कळसुबाई समिती स्थापन झाली असून सद्या संस्थेच्या सहाय्याने 3 हजार महिलांसोबत हे काम सुरू असल्याची माहिती श्रीमती पोपरे यांनी यावेळी दिली.

ज्या प्रकारे गावरान बीज बँक अहमदनगर जिलह्यात  झाली आहे अशाचप्रकारे गावोगावी अशा बीज बँका निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आगामी काळात शिक्षणामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतींचा मिलाफ असावा’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 10 : कोरोना काळात सर्वच नकारात्मक गोष्टी घडल्या असे नसून मुलांच्या शिक्षणात पालक अधिक लक्ष द्यायला लागले ही निश्चितच जमेची गोष्ट या काळात झाली आहे असे आपण मानतो. कोरोना नंतरच्या आगामी काळातील शिक्षणात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा मिलाफ असावा. उभय पद्धतींचे मिश्र शिक्षण हाच शिक्षणाचा भावी मार्ग राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

नवभारत टाइम्स वृत्तपत्रातर्फे राजभवन येथे ‘डिजिटल काळातील शिक्षणाचे स्वरूप’ या विषयावर मंगळवारी (दि. 9) एक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी राज्यपाल बोलत होते.  परिसंवादाला विविध शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक, प्रशासक व विश्वस्त उपस्थित होते.

गरज हीच शोधाची जननी असते. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यासाठी अनेक वर्षे समाजात अनुत्साह होता. मात्र कोरोना काळात सर्वांनी ऑनलाईन शिक्षणाचा अंगीकार केला. अर्थात, इंटरनेट सुविधा व स्मार्ट फोन सर्वांना उपलब्ध नसल्यामुळे काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे वर्गखोलीत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला सध्या तरी पर्याय नाही असे मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांचा एकाग्रता अवधी अतिशय कमी झालाय : तज्ज्ञांचे मत

ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे लाभ सर्वांनी पाहिले आहेत त्यामुळे ही पद्धती कायम राहणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचा सामाजिक व भावनिक विकास, कला व क्रीडा अभ्यास तसेच प्रात्यक्षिक कार्यासाठी प्रत्यक्ष शाळेतील  शिक्षण आवश्यक असल्याचे मत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोरोना काळात विद्यार्थ्यांचा एकाग्रता अवधी अतिशय कमी झाला असून विद्यार्थ्यांचे लक्ष गुंतवण्यासाठी शैक्षणिक सामग्री विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे विकसित करावी लागेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सायबर सुरक्षा या विषयाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध शिक्षण संस्थांना ‘शिक्षण योद्धा’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला नवभारत टाइम्सचे संपादक सुंदर चंद ठाकूर, लतिका शर्मा, धर्मेंद्र त्यागी, राहुल देशपांडे, सुमित मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.

पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

0

मुंबई, दि. 10 : राज्यातील  अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या आणि वजन व उंची मोजमापांच्या माहिती संकलनामध्ये झालेल्या उच्च प्रगतीनुसार पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे. पोषण ट्रक ॲपवरील वर्गीकरणाच्या अनुषंगाने केंद्र शासनास राज्य शासनाकडून अवगत केले गेले असल्याने व त्यानुषंगाने केंद्र शासनाकडून कार्यवाही सुरु असल्याने कुपोषित मुलांचे योग्य वर्गीकरण पोषण ट्रॅकरमध्ये दिसून आले आहे. कुपोषित बालकांना आवश्यक उपचार देऊन सुपोषित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे महिला व बालविकास विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या पोषण ट्रॅकर या संगणक आज्ञावलीतील तांत्रिक दोषामुळे कुपोषित मुलांच्या माहितीची द्विरुक्ती होत होती व उंची व वजनाच्या अनुषंगाने मुलांचे तीव्र कुपोषित, अति तीव्र कुपोषित व सुपोषित वर्गीकरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात चुका होत होत्या.  आज्ञावलीतील तांत्रिक दोष दूर करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने  दि. 9 मार्च 2021 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये तसेच  दि. 5 मार्च, 8 मार्च, 28 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर, 2021 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंगमध्येही हे दोष दूर करण्याबाबत केंद्र शासनास विनंती केलेली आहे.  आज्ञावलीतील हे दोष केंद्र शासनाने मान्यही केले असून ते दूर करण्याबाबतची कार्यवाही केंद्र शासन स्तरावरुन सुरु आहे. आज्ञावलीतील दोष महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याबाबत व पोषण ट्रॅकर ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याबाबत केंद्र शासनाकडून राज्य शासनाचे कौतुक करण्यात आले आहे.  तसेच संगणक अज्ञावलीतील तांत्रिक दोषामुळे कुपोषित मुलांच्या माहितीची द्विरुक्ती पुन्हा होणारी नाही याबाबत आश्वासित केले.

पोषण ट्रॅकर ॲपच्या अज्ञावलीच्या दोषामुळे दिसणारी माहे सप्टेंबर, 2021 पूर्वीची चुकीची आकडेवारी असून राज्य शासनाने तांत्रिक दोष निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्र शासनाने ॲपमधील तांत्रिक दोष दूर केल्यानंतर सुधारीत आकडेवारी प्राप्त झाली आहे.  दि.10 नोव्हेंबर, 2021 रोजी पोषण ट्रॅकर ॲपवरील आकडेवारीनुसार तीव्र कुपोषित (MAM) 6760, अति तीव्र कुपोषित (SAM) 6526 अशी आहे.

ज्या इतर राज्यांनी पोषण ट्रॅक ॲपचा वापर कमी प्रमाणात केला आहे त्या राज्यांमध्ये कुपोषित मुलांच्या नोंदी या ॲपवर कमी प्रमाणात झाल्या आहेत  म्हणून त्या राज्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी आहे हे सिद्ध होत नाही, असेही महिला व बालविकास विभागाने कळविले आहे.

एसटी संप :राज्यभरात 918 जणांवर निलंबनाची कारवाई

0

मुंबई- एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलगीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे.त्यामुळे आता राज्य सरकारने आज 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई केली आहे. तर कालही 376 संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 918 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत आंदोलनावर गेले आहे. राज्यातील अनेक डेपो बंद आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, हायकोर्टातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची विनंती केली होती. पण, संघटना लेखी आश्वासनाशिवाय मागे हटण्यास तयार नाहीत.

आयकर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे निवृत्ती वेतनधारकांना आवाहन

0

पुणे, दि. 10:- पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय सेवातून सेवानिवृत्त झालेले भा.प्र.से., भा.पो.से. आदी तसेच माजी आमदार यांच्यासह सर्व राज्य शासकीय सेवा निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी गुंतवणूकीची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.

निवृत्तीवेतनधारकांचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निवृत्तीवेतनाचे करपात्र उत्पन्न सर्व सवलती वगळता 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयकराची गणना होते. त्यामुळे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांहून अधिक असल्यास त्यांनी आयकर कायदा 1961 चे कलम 80 सी, 80 सीसीसी, 80 डी, 80 जी नुसार गुंतवणूक, बचत केली असल्यास त्याची कागदपत्रे, सत्यप्रत तसेच पॅनकार्डची सत्यप्रत कोषागार कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष किंवा to.pune@zillamhakosh.in या ई-मेल पत्त्यावर मेलद्वारे 20 नोव्हेंबर 2021 अखेर सादर करावी.

कागदपत्रे विहित मुदतीत सादर न केल्यास अप्पर कोषागार अधिकारी पुणे हे आयकर कायदा कलम 191 नुसार आहरण संवितरण अधिकारी म्हणून सन 2021-22 च्या आयकराची कपात पात्र निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातून हप्त्यांमध्ये करतील, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.