क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण व्हायला २२ वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता!! सचिन तेंडुलकर यांनी आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण आणि अनेक आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते, ‘‘चला हवा येऊ द्या’’ च्या
मास्टर ब्लास्टर विशेष भागाचे!! झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या आगामी भागात मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आला होता. या भागात सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पांची ही अनोखी मैफिल २२- २३ मे रोजी सोमवार आणि मंगळवारच्या भागात रसिकांना झी मराठीवर अनुभवता येणार आहे.
सचिनच्या सोबत त्याची पत्नी अंजली, त्याचे भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, बहीण सविता तेंडुलकर, तसेच त्याचे मित्र अतुल रानडे, जगदीश चव्हाण आणि अजित भुरे हेही चला हवा येऊ द्या च्या सेटवर हजर होते.
सचिनच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर लवकरच अवतरणार असून क्रिकेट शौकिनांसाठी आनंदाची बाब आहे. ‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’ चित्रपट ही आपल्या आयुष्यातली आणखी एक महत्त्वाची खेळी आहे, असं सांगत ही खेळी आपण आपल्या आई-बाबांना समर्पित करणार असल्याचं सचिनने सांगितलं. ‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’
मध्ये साहित्य सहवास ते शिवाजी पार्क मैदान आणि शारदाश्रम शाळा ते भारतरत्न हा सर्वोच्च किताब स्वीकारतानाचा त्याचा प्रवास उलगडला आहे. त्याच रोमहर्षक प्रवासाची झलक त्यानं चला हवा येऊ द्या मध्ये मारलेल्या या खास गप्पांमधून उलगडत गेली.