लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-निर्माता अशी चतुरस्र कामगिरी करत रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कलाकृतींची रचना करण्यात यशस्वी झालेले दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकच्या संकल्पनेतून आठ चित्रपटांची योजना आखली आणि या अंतर्गत तयार झालेले ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चारही चित्रपटांनी रसिकांची जोरदार पसंती मिळवली. माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नुकतेच ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ हे दोन चित्रपट पाहून शिवराज अष्टकच्या टिमचं मनापासून कौतुक केलं.
‘पावनखिंड’ प्रदर्शित झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक केशव वाळींबे यांनी दिग्पाल यांच्याशी चर्चा करून ‘पावनखिंड’ दाखवण्याचं आयोजन केलं. मोहनजी यांनी ‘फर्जंद’ पाहिलेला होता. यासोबत मोहनजींनी ‘शेर शिवराज’ही पहावा अशी शिवराज अष्टकाच्या टिमची इच्छा होती. दिग्पाल यांना मे महिन्यात केशव वाळींबे यांचा फोन आला आणि त्यांनी दिनांक २५ आणि २६ जुलै रोजी नागपूरमधील रेशीमबागेतील संघ मुख्यालयात ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ दाखवण्याचं आयोजन केल्याचं सांगितलं. त्यानुसार मोहनजींसह संघाच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी विशेष शोजचं आयोजन करण्यात आलं. दिग्पाल आणि त्यांचे बंधू ध्वनी संयोजक निखिल लांजेकर हे दोघेही स्वयंसेवक आहेत. त्यांच्या टिममधील बरेच जण संघ परिवाराशी संबंधित आहेत. त्यामुळं सर्वांनाच या क्षणांची उत्सुकता होती.
शिवराज अष्टकची टिम २५ जुलैला नागपूरात पोहोचली व सकाळी त्यांनी तिथल्या लोकांशी चर्चा केली. संध्याकाळी रेशीमबागेच्या मैदानावरील डॅा. हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ‘पावनखिंड’ दाखवण्यात आला. बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या वीरांच्या बलिदानानाचा प्रसंग पाहिल्यावर अमराठी स्वयंसेवकांच्याही भावना अनावर झाल्या. मोहनजींनी या चित्रपटाचं मनापासून खूप कौतुक केलं. त्या दिवशी मोहनभारतीचे अध्यक्ष दादा तथा अभीजित गोखले यांच्या हस्ते शाल आणि केशर देऊन शिवराज अष्टकच्या टिमचा गौरव करण्यात आला. त्यानंतर ‘शेर शिवराज’च्या स्क्रिनिंगपूर्वी दिग्पाल यांनी शिवराज अष्टकाची माहिती दिली. सर्व प्रचारकांनी शिवराज अष्टकातील सिनेमे जगभर पोहोचले पाहिजेत असं म्हणत महाराजांचा वारसा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवत असल्याबद्दल कौतुक केलं. शिवराज अष्टकाच्या माध्यमातून निस्वार्थ भावनेतून राष्ट्रीय कलाकृती घडवण्याचं कार्य करत असल्याचं मोहनजी भागवत म्हणाले. कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षेविना केलेल्या या गोष्टी अमूल्य असून, तुमची समाजाप्रती असलेली भावना प्रेरणादायी असल्याचंही सरसंघचालक म्हणाले.
या शोसाठी दिग्पाल लांजेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, निखिल लांजेकर, राजवारसा प्रोडक्शनचे निर्माते प्रद्योतजी पेंढारकर आणि अनिल वरखडे, राजवारसा प्रोडक्शनचे क्रिएटीव्ह हेड प्रसाद कुऱ्हे उपस्थित होते. दोन दिवसांची ही भेट शिवराज अष्टकाच्या टिमचं मनोबल उंचावणारी ठरल्याची भावना दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केली.