चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले कि, ब्राम्हण महासंघाचा माझ्या उमेदवारीला विरोध नाही, तर त्यांच्या काही मागण्या आहेत, ज्या सरकारने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा रोष सरकारवर आहे. पण सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्यांच्या मागण्यांवर निर्णय होत नाही. आचारसंहिता समाप्त होताच आम्ही त्यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार करू. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचा उमेदवार माघार घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
पुणे : कोथरूड मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना बाहेरचे उमेदवार लादल्याचे कारण देत विरोधाचे राजकारण करण्यात आले आहे. कधी जातीयतेचा मुद्दा उपस्थित ब्राम्हण महासंघाने त्यांना विरोध दर्शवला. आणि कोथरूड या भाजपच्या बालेकिल्ल्यात चंद्रकांतदादांना शह देईल असा तगडा उमेदवार मिळेनासा झाल्यावर काँग्रेस- राष्ट्रवादीसह विरोधकांनी मनसेचे उमेदवाराला पाठिंबा देत ” दादां ”चा पराभव करण्याची जबाबदारी मनसेच्या किशोर शिंदेवर सोपवून कोथरूड ला एकास एक लढत देण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे भाजपच्याच काही स्थानिक मंडळींनी पाटलांविरोधात सुरु केलेली छुपी मोहीम दिसू लागली तर दुसरीकडे संदीप खर्डेकर ,मंजुश्री खर्डेकर सारख्या ब्राम्हण समाजातील भाजपवासियांनी पाटलांची साथसंगत सुरु केली . अखेरीस विरोधाचे सारे राजकारण मावळतीच्या दिशेला निघाले असून शेवटच्या टप्प्यात अखिल भारतीय महासंघाने चंद्रकांतदादा पाटलांना पाठिंबा जाहीर केला असल्याची घोषणा एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागणार आहे . त्यापार्श्वभूमीवर ब्राम्हण महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक पार पडली. त्यात ब्राह्मण समाजाच्या समस्या आणि मागण्या यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर महासंघाने एका पत्रकाद्वारे दादांच्या पाठिंब्याची घोषणा केली.यावेळी प्रदेश अध्यक्ष मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे उपस्थित होते.