आदिवासी नागरी जीवनासह पुणेकर अनुभवणार तिबेटी संस्कृती
‘द आर्ट ऑफ स्पाईन केअर’ प्रदर्शनाचे उद्धाटन
पुणे- तिबेटी संस्कृतीचे दर्शन…, मुंबईतील पाऊस.., आदिवासी नागरिकांचे जीवन.., वाघाच्या वैविध्य पूर्ण मुद्रा.., ऋतूंचक्रांमध्ये निसर्गात होणारे बदल.., आदी प्रसंग चित्र तसेच छायाचित्रांच्या स्वरूपात अनुभवण्याची संधी ‘द आर्ट ऑफ स्पाईन केअर’ प्रदर्शनातून पुणेकरांना मिळत आहे.
स्पाईन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘द आर्ट ऑफ स्पाईन केअर’ या प्रदर्शनात फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि मणक्याच्या विकारांवरचे विशेषज्ञ शल्यविशारद डॉ. शेखर भोजराज यांनी काढलेली चित्रे व छायाचित्रे मांडल्यात आलेली आहेत. फाऊंडेशनचे सदस्य डॉ. तुषार देवरे, संचेती रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के एच संचेती, हर्डीकर रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शरद हार्डीकर याच्या हस्ते शनिवारी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शेखर भोजराज, डॉ.शिल्पा भोजराज, सदस्य डॉ. शैलेश हातगावकर, डॉ. ऋषिकेश मेहता, डॉ. आदित्य काशीकर आदी उपस्थित होते. डॉ. भोजराज आणि त्यांच्या पत्नी डॉ. शिल्पा भोजराज यांनी १९९८ साली स्पाईन फांऊंडेशनची स्थापन केले असून या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मणक्यांच्या आजारांवर उपचार करण्यात येतात. या कामासाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
प्रदर्शनात डॉ. भोजराज यांनी साकारलेल्या मूर्त आणि अमूर्त शैलीतील १४० कलाकृती पहायला मिळत आहेत. येथे ठेवण्यात आलेली छायाचित्रे भोजराज यांनी देशात किंवा देशाबाहेर वेगवेगळ्या भागात प्रवास करताना मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामधून काढलेली आहेत. तसेच निरनिराळ्या भागातील वैशिष्ठपूर्ण गोष्टी चित्रांच्या माध्यमातून कागदावर रेखाटलेल्या आहेत. गावाकडचे नागरी जीवन, ऊन पावसाच्या खेळांमुळे निसर्गात झालेले बदल, चाळ संस्कृती, वाळवंट भागातील जीवन, जंगल सफरीमध्ये दिसणारे हत्ती आणि हरीण आशा वैविध्यपूर्ण कलाकृती हुबेहूब रेखाटल्या आहेत तसेच कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. कलाकृतींचे सोबत त्याचे वर्णन नेमक्या शब्दात लिहलेले आहे, यातून चित्रांमागील अर्थ उलघडण्यास मदत होत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून रासिकांना कालाविष्कारांची सफर घडत आहे.
डॉ भोजराज म्हणाले,”लहानवयापासूनच कलेची आवड होती, प्रदर्शनात मांडण्यात आलेली बऱ्याच कलाकृती चाळीस वर्षांपूर्वीच्या आहेत. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी निधी उभा करण्याच्या हेतूने प्रदर्शन भरविले आहे. यामुळे गरजूंना मणके दुखीवर उपचार करण्यात येतील. फाऊंडेशनने आतापर्यंत देशभरात १५ केंद्रांच्या माध्यमातून ३२,३३७ पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत, तसेच १२४१ शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत.जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय रुग्नालाच्यामध्ये जाऊन शस्त्रक्रिया आणि उपचाराचे काम सुरु आहे. आदिवासी भागात तसेच झोपडपट्टी परिसरातील रुग्णांना याचा मोठ्याप्रमाणात फायदा होत आहे.”
‘द आर्ट ऑफ स्पाईन केअर’ प्रदर्शन उद्या (१९ डिसेंबर) पर्यंत घोले रस्त्यावरील पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे सकाळी साडे दहा ते रात्री साडे सात या वेळात सर्वांसाठी मोफत खुले आहे.पुणेकर रसिकांनी या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा., असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.