पुणे- महापालिकेच्या सांखिकी विभागात संगणक ऑपरेटर भरतीच्या टेंडर प्रकरणात मोठा घोटाळा होत असल्याची चर्चा असून अपात्र ठेकेदारांना पात्र ठरवून टेंडर देण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती मिळते आहे. प्रशासनाने मात्र या प्रकरणी सर्व काही नियमानुसार होत असल्याचा दावा केला आहे. आणि या टेंडर साठी कोणत्याही आमदार वा लोकप्रतिनिधीचा दबाव आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी कि ,सांखिकी विभागात सहा महिने कालावधी साठी ६० संगणक ऑपरेटर भरतीचे ६८ लाखाचे टेंडर मागविण्यात आले होते . या साठी चौघांनी टेंडर भरले होते . . महापालिकेच्या नियम अटीत मात्र यातील दोन कंपन्या बसत नसताना त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप होतो आहे . २ वर्षाचा अनुभव , शासकीय कामाचा अनुभव , भविष्य निर्वाह निधी आणि इएसआय ची चलने अशा बाबी नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यायला हवे होते . पण प्रत्यक्षात चारही ठेकेदारांना पात्र करण्यात आले आहे . मर्जीतील ठेकेदाराला आणि एका लोकप्रतिनिधीच्या पीए ला काम देण्याच्या उद्देशाने जादुई कागदपत्रांची रेलचेल होऊ लागल्याची चर्चा यावर झडते आहे .