पुणे : निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाच्या वतीने आयोजित शस्त्र पूजन कार्यक्रमाला, कोथरूड मतदारसंघातील उमेदवार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संघाच्या गणवेशात एन्ट्री करत शस्त्रपूजन करून संघ परंपरा जोपासली.
चंद्रकांतदादा यांनी विशेष उपस्थिती लावत संघ गणवेशात पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करून संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय समरसता गतीविधी मंडळ सदस्य रमेश आढाव, रमेश पांडव, सुधीर जवळेकर ,संदीप खरडेकर, मुरलीधर माहोळ तसेच संभाजी भाग कार्यवाहक उपस्थित होते.
आठवणींना मिळाला उजाळा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांचा अतिशय प्रामाणिक सेवक म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांचा लौकिक आहे. त्याचीच प्रचिती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा पहायला मिळाली. कोथरूडमध्ये एमआयटी संस्थेच्या मैदानावर विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमात चंद्रकांतदादा शिस्तबद्ध स्वयंसेवकाप्रमाणे सहभागी होताना पाहून, अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, पुण्यात पाटील यांनी संघाचे काम केले आहे. तीन दशकांहून अधिक काळ पुण्यातील कार्य वाटचालीतील आठवणींना या वेळी उजाळा देण्यात आला.
विजयादशमी हा अवघ्या भारतवर्षांचा मोठा उत्सव. १९२५ मध्ये विजयादशमीच्याच दिवशी केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हा दिवस संघस्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजनाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी तसेच सार्वजनिकरित्या शक्तीरूपी दुर्गा, कालीमाता यांच्या पूजेसोबत शस्त्रांचे पूजन करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. हा उत्सव देशाचे सरंक्षण व कायद्याचे रक्षण या कामात शस्त्रांचे वापर करणाऱ्याकरिता विशेष आहे. संकटसमयी शस्त्र आपल्या प्राणांचे रक्षण करतात या विश्वासाने शस्त्रांचे पूजन केले जाते.