पुणे-मेधावी संस्थेतर्फे आयोजित ‘स्वर सुमन’ कार्यक्रमात यंदा प्रख्यात शास्त्रीय गायिका ध्रिती चटर्जी यांच्या शास्त्रीय गायनाचा बहारदार कार्यक्रम रविवारी सायंकाळी ६ वाजता ‘मोरेश्वर सभागृह’ सिहंगड रस्ता इथे पार पडला. मुळच्या कलकत्त्याच्या आणि आता पुण्यात स्थायी झालेल्या ध्रिती चॅटर्जी यांच्या गायनाने मैफलीस प्रारंभ झाला. ध्रिती यांनी ठुमरी, दादरा, टप्पा आणि चैती सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले व सर्वांची वाहवा मिळवली. ध्रिती यांना तबला साथ अरुप सेन गुप्ता यांची लाभली आणि हार्मोनियम साथ संतोष घंटे यांची लाभली. या कार्यक्रमानंतर प्रख्यात सरोद वादक अनुपम जोशी यांचे सरोद वादन सादरीकरण झाले. त्यांनी अतिशय उत्तम आणि आर्त अश्या राग यमन कल्याण मध्ये आलाप जोड तारपरण आणि त्याला जोडून झाला असे पारंपारिक सादरीकरण करून उपस्थितांना वेगळीच अनुभूती दिली. त्या नंतर विलंबित आणि ध्रितलयमध्ये एक रचना आणि त्यानंतर त्रितालांमध्ये दोन बंदिशे रचना सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबला संगत अरुप सेन गुप्ता यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पटवर्धन यांच्ये होते. तबला वादक अविनाश पाटील यांची आणि अन्य कलाकारांच्यी या मैफलीस विशेष उपस्थिती लाभली होती. हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य होता. मेधावी संस्थेतर्फे सन २००६ पासून शास्त्रीय गायन आणि वाद्यसंगीत यांच्या प्रसारासाठी वर्षातून सहा विशेष कार्यक्रमांचे रसिकांसाठी मोफत आयोजन केले जाते.