पुणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांची संख्या १८१ वर गेली आहे. मात्र, याउलट जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, आणि पोलीस यंत्रणेने दाखवलेल्या सतर्कतेमुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या दोन – तीन दिवसांमध्ये घटल्याचे दिसून आले होते. त्यात महाराष्ट्रातील पहिल्या दोन कोरोना रुग्णांसह पिंपरीतील ३ रुग्णांना ठणठणीत बरे झाल्यामुळे दवाखान्यातून घरी सोडण्यात आल्याने काहीसे सकारात्मक आणि दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. परंतु , दोन दिवसांच्या विरामानंतर शनिवारी (दि.28) रोजी एकाच दिवशी चार कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दोन दिवसांनंतर एकाच दिवशी चारने वाढ झाली आहे . प्रशासनासाठी ही गंभीर बाब असून पुण्यासाठी धोक्याचा इशारा देखील असू शकतो. जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा व आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत कडक उपायोजना केल्या जात आहे .परंतु अद्यापही नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे समोर येत आहे . यामुळेच बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . पुण्यात आतापर्यंत सुमारे 975 संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आले
कोरोना पॉझिटीव्ह असलेले सातजण उपचारांनंतर बरे झाले असून त्यांनाही घरी पाठविण्यात आले आहे.
दोघांची प्रकृती चिंताजनक
कोरोनाचे एकूण 17 रुग्ण अजूनही रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात एकूण 12 जण दाखल आहेत तर भारती रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, केईएम रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय (नगर रोड), सह्याद्री रुग्णालय (कर्वे रोड) या ठिकाणी प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
परदेशातून शहरात आलेल्या प्रवाशांची एकूण संख्या 2,042 होती. त्यापैकी 1318 जणांची क्वारंटाईनची 14 दिवसांची मुदत संपली असून उर्वरित 724 जण अजून निरीक्षणाखाली आहेत