जर्मन लेखकाची प्रभू येशू वरची भक्ती गीते आली मराठीत !
पंचहौद मिशन मध्ये जोसेफ साळवी यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे :
एच. बँलन्टाईन या जर्मन लेखकाची प्रभू येशू वरची भक्ती गीते आता सीडी द्वारे मराठीत आली असून पुण्यातील गायक सुधाकर गायकवाड, आणि त्यांची कन्या मेरी गायकवाड यानी त्यासाठी पुढाकार घेतला ! १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पंचहौद मिशन मध्ये जोसेफ साळवी यांच्या हस्ते सीडीचे प्रकाशन झाले.या सीडी तील निवडक भक्तिगीते सादर करण्यात आली . सोनाली साळवी ,विश्वास गांगुर्डे ,राज गांगुर्डे यावेळी उपस्थित होते . पुण्यातील चर्चेस मध्ये या सीडी चे वितरण करण्यात येणार आहे .
‘अपोलो म्युझिक प्रेझेंट’, पुणेच्या वतीने’ येशू प्रभू माझा ‘या नावाने १० भक्तिगीते ध्वनिमुद्रित करण्यात आली आहे. भारतीय वाद्यांचा वापर हे या गीतांचे वैशिष्ट्य आहे . ‘येशू प्रभु माझा’ या भक्तीगीताची संकल्पना सुधाकर गायकवाड यांची असून ‘अपोलो म्युझिक प्रेझेंट’च्या मेरी गायकवाड यांनी निर्मिती केली आहे. ही भक्तीगिते जर्मन लेखक एच. बँलन्टाईन यांनी लिहिली असून ते जर्मनीमधील प्रसिद्ध लेखक – साहित्यिक आहेत.मराठीत रेव्हरंड टिळक ,पंडिता रमाबाई यांची येशुंवरील भक्तिगीते उपलब्ध आहेत . मात्र ,जर्मन लेखकाची गीते प्रथमच उपलब्ध झाली आहेत.
‘प्रभू येशूवर आतापर्यंत साहित्य – कथा – कादंबऱ्या – खंड – अनेकांनी अनेक प्रकारचे – लिखाण आपआपल्या परीने देशात – विदेशात केलेले आहे. अनेक विचारवंतांनी आपले योगदान दिले आहे. ख्रिश्चन हा धर्म नाही तर प्रभूकडे जाण्याचा मार्ग आहे. शत्रूवर प्रेम करा. एकमेकांशी प्रेमाने वागा. नम्रता व प्रीतीने वागावे ही भावना मनात ठेवावी. नम्रता – प्रीती – प्रेम – एकमेकांबद्दल आदर ठेवावा ही शिकवण प्रभू येशूने दिली आहे. याच भावना सीडीतील गीतांमध्ये आहे’,असे मनोगत सुधाकर गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .
‘सुधाकर गायकवाड व मेरी गायकवाड हे चांगले कलाकार – गायक आहेत. १० भक्तीगिताच्या ध्वनिमुद्रीत सीडी च्या माध्यमातून प्रभू येशूची शिकवण अनेक समाज घटकापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे’,असे उद्गार जोसेफ साळवी यांनी काढले . सुधाकर गायकवाड यांनी यापूर्वी मेलडी मेकर्स समवेत देशभर गाण्याचे कार्यक्रम केले आहेत .