ब्रम्हचारी राहून आपल्याच बायकोवर प्रेम करा ‘ सांगणारे बुवा,’सूर्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा’,मराठी कवितेचा प्रवास गजबजला …
पुणे:सूर्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा, नेटफ्लीक्स वाले इतर मालिका पाहणाऱ्याना हसतात, आधीचे वाईट सरकार, आताचे वाईट सरकार, यातील तुम्हाला कोणते आवडते, असे विचारणारे वाहिनी पत्रकार, ब्रहमचारी राहून ‘ आपल्याच बायकोवर प्रेम करा ‘ सांगणारे बुवा, घरी अलेक्साशिवाय कोणी ऐकून घेत नाही, अशा वेगवेगळ्या कवितांमधील उपहास, प्रतिमा, गुदगुल्या-बोचकाऱ्यांमुळे उठलेला हास्यकल्लोळ अशा वातावरणात ‘ मराठी कवितेचा प्रवास ‘ हा संवाद कार्यक्रम गाजला.
अशोक नायगावकर, वैभव जोशी यांच्याशी मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला.
‘दकनी फाऊंडेशन ‘आयोजित डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी पं. नेहरू सभागृह ( घोले रस्ता ) येथे हा कार्यक्रम झाला. रसिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
‘ थँक गॉड,कुसुमाग्रज , तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं ‘ ही कविता वैभव जोशी यांनी सादर करुन ‘ हास्यविषाद योग ‘ साधला. गझल आणि कविताही त्यांनी सादर केल्या.
कवी द्रष्टा असतो, कारण त्याला दूरचे दिसते, कवी खडडयात जातो कारण, त्याला जवळचे दिसत नाही ‘ अशी टिप्पणी नायगावकर यांनी केली. ‘ कवचकुंडले काढल्यावर कर्णाची जशी अवस्था होते, तशी कविता करून झाल्यावर कवीची होते ‘ अशी दाद मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
टिळक’ ही गाजलेली कविताही नायगावकर यांनी सादर केली.’समुद्राला जलोदर झालाय, आणि नदीला डी हायड्रेशन…’ अशा ओळींनाही भरभरून दाद मिळाली.