पुणे :
‘नृत्ययात्री ‘ संस्थेतर्फे ‘चुडामणी प्रदानम ‘ पौराणिक नृत्यनाटिकेचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार ,२२ नोव्हेंबर रोजी रामायणातील प्रसंग नृत्यातून रंगणार आहे . चेन्नई च्या ‘कलाक्षेत्र फौंडेशन’च्या सहकार्याने ४ वर्षांनी ही नृत्यनाटिका पुणेकर रसिकांच्या भेटीला येत आहे . ‘कलाक्षेत्र फौंडेशन’ ही गुरु रुक्मिणीदेवी यांनी १९३६ मध्ये स्थापन केलेली संस्था आहे .
हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजता होणार आहे . ‘नृत्ययात्री ‘ संस्थेच्या प्रमुख मेघना साबडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
या नृत्यनाटिकेत चेन्नईचे ४० कलाकार सहभागी होणार आहेत . ‘कलाक्षेत्र ‘ संस्थेच्या दिग्दर्शक रेवथी रामचंद्रन तसेच पुण्याच्या सांस्कृतिक विश्वातील अनेक मान्यवर रामायणावर आधारित या पौराणिक नृत्य नाटिकेचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत .
अशोक वाटिकेत कैद सीतेला भेटून धीर देऊन रामाला क्षेम कुशल सांगण्यासाठी हनुमान परत निघाले तेव्हा चुडामणी हे रत्न सीतामाई हनुमानाजवळ खूण म्हणून देते . सुग्रीवासह राम लंकेस सीतामाई च्या सोडवणुकीसाठी येतील असे सांगून हनुमान लंकेतून निघतात . जटायू वधापासूनचे रामायणातील अनेक प्रसंग या नृत्य नाटिकेत अनुभवायला मिळणार आहेत .