वाघोली परिसरातील व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे
वाघोली : वाघोली परिसराचा विकास वेगाने होत आहे. नागरी वस्ती ज्या वेगाने वाढतेय त्याच वेगाने व्यापाऱ्यांची संख्या वाढतेय. व्यापारी हा नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविणारा महत्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे या परिसरातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांनी प्राधान्य द्यावे, असे मत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची घटक असलेल्या वाघोली व्यापारी संघटनेच्या वतीने व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसच्या उपअधीक्षक सई भोरे पाटील, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकर, माथाडी विभागाचे सचिव साळुंखे, मते, भोसले, काटा वेधमापनचे सहायक निरीक्षक उदमले, अधिकारी गिरीश वाघमारे, दिपक शेजवळ, ग्राहक पंचायतचे विलास लेले, विजय नरेला,, नवनाथ सोमसे, नितिन अग्रवाल, शिल्पी दुबे, मनोज कांकरीया, शेखर लुंकड, जाचक, बापु गायकवाड, बाबुलाल चौधरी, दोलाराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यापारी वर्गाला व्यवसाय करताना वर्गणी व खंडणीचा त्रास होत आहे. दमदाटी, दुकानफोड्या यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे व्यापारी भयभीत झाले आहेत. संबंधीत प्रशासनाने वेळीच लक्ष घालून व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.