अॅमेझॉनच्या विरोधात व्यापाऱ्यांचा ‘गो बॅक’चा नारा!
देशभरातील व्यापारी एकवटले; पुण्यातही आंदोलन
पुणे, : नियम धाब्यावर बसवून व्यापार केल्याचा अॅमेझॉनवर देशातील रिटेल व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कैट ने केला आहे. अॅमेझॉनमुळे देशातील रिटेल व्यापारी अडचणीत येत असून त्याला विरोध म्हणून अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस भारत भेटीवर आलेले असताना आज पुण्यासह संपूर्ण देशभरात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
पुण्यात सिंहगड रस्ता, कोथरुड आणि इतर अनेक ठिकाणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले आणि अॅमेझॉन, जेफ बेजोस गो बॅकचा नारा व्यापाऱ्यांनी दिला. देशभरातील रिटेल व्यापाऱ्यांचीशिखर संघटना असलेल्या कैट ने दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने देशातील 7 कोटी रिटेल व्यापारी जगवायचा असेल तर, ऑनलाइन व्यापार करून सरकारचा करोडो रुपये कर बुडविणाऱ्या अॅमेझॉनसारख्या विदेशी कंपन्यांवर बंधने लादावीत अशी अपेक्षा आहे, असे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष व कैट चे महाराष्ट्र सचिव सचिन निवंगुणे यांनी आज सांगितले.
रिटेल व्यापाऱ्यांची देशातील संख्या मोठी आहे. देशाची अर्थव्यवस्था, व्यापार व उद्योगांची स्थिती व देशातील बेरोजगारी लक्षात घेता केंद्र सरकार याकडे गांभिर्याने लक्ष देईल अशी अपेक्षा असल्याचेही सचिन निवंगुणे यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष सोमाराम राठोड, सुनील गेहलोत, रघुनाथ तापकीर, नाना कुंबरे, मांगिलाल चौधरी, दादा भेलके, अप्पा फडके आदी व्यापारी उपस्थित होते.