पुणे-दिल्ली येथे पार पडलेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमातपुणे जिल्ह्यातील 136 जण सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पुणे व कॅन्टोमेंट मधील ९२ तर पिंपरी चिंचवड मधील 32 नागरिक आहेत तर उरलेले पुणे ग्रामीण भागातील आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत सहभागी झालेल्या 30 ते 35 जणांना शोधून काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील नागरिकांचा समावेश आहे.
या नागरिकांमध्ये सध्या तरी कोरोना संदर्भातील कुठलीही लक्षणे नाहीत अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. दिल्लीतील या कार्यक्रमासाठी देश विदेशातील नागरिक सहभागी झाले होते.
पोलिसांनी देखील पुण्यातील नागरिक सहभागी झालेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 136 नागरिकांची यादी पोलिसांना मिळाली होती. त्यातील काही जणांची माहिती पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोधून काढली आहे. तर इतर लोकांचा पोलीस शोध घेत आहेत
‘तबलीग-ए-जमात’ कार्यक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्रात परतलेल्या शेकडो जणांचा शाेध सुरू आहे. मुंबईतील ४३१ जण, पुणे-पिंपरीचे १३६ जण कार्यक्रमात सहभागी झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अकोल्यात १० तर पुण्यात ४० जणांना शोधले आहे. दाेघे औरंगाबादेत परतल्याची माहिती आहे. क्रांती चाैक पाेलिसांनी मंगळवारी त्यापैकी एकाला घाटीत दाखल केले, तर दुसऱ्याच्या शाेध सुरू आहे. शहरातील ४० नागरिक फेब्रुवारीत कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते १ मार्चच्या दरम्यान शहरात परतले. त्यांची यापूर्वीच तपासणी करून हाेम क्वाॅरंटाइन केले आहे.
महाराष्ट्रमध्ये नवे ८२ रुग्ण, देशातील आकडा १५४१ वर
देशात मंगळवारी कोरोनाचे १५६ नवे रुग्ण मिळाले. देशातील एकूण रुग्णांचा आकडा १,५४१ वर गेला आहे. ९ बळींसह मृतांचा आकडा ४५ वर गेला आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ८२ नवे रुग्ण मिळाले. 59 जण तर एकट्या मुंबईत आढळले. देशातील कोणत्याही राज्यात एकाच दिवसात सापडलेले ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा आता ३०२ वर पोहोचला आहे. मुंबईनंतर नगरमध्ये ३ तर पुणे, ठाणे, वाशी, विरार आणि कल्याणमध्ये प्रत्येकी २ रुग्ण सापडले.