मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी, महिलांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी सर्व येऊया एकत्र, लढुया एकत्र, पुढे जाऊया एकत्र हा संकल्प घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा 12 वे राष्ट्रीय अधिवेशन 27 ते 30 डिसेंबर 2019 दरम्यान मुंबईत पहिल्यांदाच होणार असून ते भायखळा येथील साबू सिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार असल्याचे माहिती राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे यांनी लोकमान्य सभागृह, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.
दरम्यान अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे म्हणाल्या की, अधिवेशनाची प्रमुख घोषणा “आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी, महिलांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी सर्व येऊया एकत्र, लढुया एकत्र, पुढे जाऊया एकत्र”. अशी असणार आहे. अधिवेशनात देशभरात महिला नागरिक म्हणून, कामगार, कष्टकरी म्हणून आणि महिला म्हणून ज्या प्रश्नांना, अत्याचारांना तोंड देत आहेत, लढत आहेत त्यावर चर्चा होऊन पुढील 03 वर्षांसाठीचा कार्यक्रम निश्चित केला जाईल. अत्याचारांशी दोन हात करणाऱ्या प. बंगाल, त्रिपुरा, केरळ, तमिलनाडु, हरियाणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमधील काही प्रातिनिधिक महिलांचा अधिवेशनात सत्कार देखील केला जाणार आहे. अधिवेशनात 800 प्रतिनिधी व 50 महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असून त्यात मंत्री, माजी मंत्री, आजी, माजी आमदार, खासदार यांचा समावेश असेल. या अधिवेशनाची जाहीर सभा 27 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे होईल. सभेला बृंदा कारत व सुभाषिनी अली या महिला चळवळीतील नेत्या, अ. भा. किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सिटूचे राज्य सचिव व नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले तसेच जनवादी महिला संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षा, माजी खासदार मालिनी भट्टाचार्य व राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे संबोधित करतील. त्याच दिवशी दुपारी 03.00 वाजता साबु सिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालय, भायखळा येथे जेएनयुच्या माजी विद्यार्थिनी व लोकशाही चळवळीसाठीची आपली बांधिलकी खुलेपणाने दर्शवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री, स्वरा भास्कर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. हे सत्र सर्वांसाठी खुले असणार आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटना ही भारतातील सर्वात मोठ्या महिला संघटनांपैकी एक संघटना आहे. जिचे 23 राज्यांमध्ये 01 कोटीहून जास्त सभासद आहेत व जी महिला अधिकार, समानता आणि सुरक्षिततेसाठीच्या लढ्यांसाठी ओळखली जाते. त्यांचे 12 वे राष्ट्रीय अधिवेशन 17 ते 30 डिसेंबर 2019 दरम्यान मुंबईत पहिल्यांदाच होणार असून ते भायखळा येथील साबू सिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे, स्वागत समिती अध्यक्षा तापोती मुखोपाध्याय, राज्य महासचिव प्राची हातिवलेकर माध्यम संयोजक शुभा शमीम यांनी संबोधित केले