पुणे : मनोरंजनासोबतच प्रेरणादायी व तणावमुक्तीच्या व्याख्यानातून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा मिळाली. यासाठी पुणे परिमंडलाने आयोजित केलेल्या स्नेहमेळा-2020 चे निमित्त ठरले व त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये स्नेहमेळा-2020 चे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार, विजय भाटकर, पंकज तगलपल्लेवार, प्रकाश राऊत, नंदकिशोर शिंदे यांची उपस्थिती होती.
तणावमुक्त जीवनासाठी संमोहन तसेच आयुष्यातील प्रेरणा यावर श्री. प्रक्षीत गायकवाड यांचे दुपारी चार वाजता व्याख्यान झाले. ओघवत्या शैलीत तणावमुक्तीसोबतच प्रेरणादायी आयुष्याची नवी वाट दाखविणाऱ्या या व्याख्यानास उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महावितरणमध्ये काम करताना ग्राहकांची सेवा करताना मिळणारे मानसिक समाधान श्री. गायकवाड यांनी अधोरेखीत केले. यानंतर रात्री 7 वाजता सातारा येथील श्री. विवेक घाडगे संचालित ‘गीतगंधʼ हा मराठी व हिंदी गाण्यांच्या ऑक्रेस्ट्रामध्ये एकाहून एक सरस गाणे सादर करून कलाकारांनी मन जिंकले. यावेळी महावितरणच्या वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) सौ. अपर्णा मानकीकर आणि ऋजुता तारे यांनी गाणे सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. स्नेहमेळा-2020 च्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.