पुणे : नेत्रदानाची संकल्पना अनेक वर्षे आहे. अगदी यकृत व किडनी दान करण्याची संख्या देखील वाढली आहे. मात्र, त्वचादानाबाबत तेवढी जनजागृती झालेली नाही. त्वचा ही माणसाच्या शरीरावर निर्माण होत असते. त्यामुळे भाजलेल्या किंवा जखमी व्यक्तीला तात्पुरता व गरजेचा उपचार म्हणून जतन केलेली त्वचा वापरणे आवश्यक असते. त्वचादान करण्याची प्रक्रिया अत्यंत सहज व सोपी असून अनेक रुग्णांना याचा उपयोग होणार आहे, असे मत पद्मभूषण डॉ.के.एच.संचेती यांनी व्यक्त केले.
त्वचादानाची प्रक्रिया सहज-सोपी असून अनेक रुग्णांना उपयुक्त ठरणारे दान- पद्मभूषण डॉ.के.एच.संचेती
सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात त्वचादानाचा जागर करणा-या डॉक्टर, संस्था, व्यक्तींचा सन्मान सोहळा
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे पंधरावे वर्ष आहे. सप्ताहांतर्गत त्वचादानाचा जागर करणा-या डॉक्टर, संस्था, व्यक्तींचा सन्मान नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाला सूर्या हॉस्पिटल त्वचा विभागाचे डॉ.जयसिंग शिंदे, मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, रोटरी क्लब आॅफ खडकीचे महेश मखिजा, शाबीर शेख, प्रकाश आरणे, प्रविण करपे, दुर्गा शुक्रे, अर्चना शहा-पाटील, सोहम वजरे आदी उपस्थित होते.
डॉ.जयसिंग शिंदे यांसह डॉ.सतिश मसकरी, डॉ.अमोल दाभाडे, समवेदना संस्थेच्या मानसी ताम्हणकर, शरयू जावळे, कुमुदिनी संस्थेच्या रोहिणी आठवले तसेच त्वचादान केलेल्यांचे नातेवाईक असलेले चंद्रकांत मोकाशी, कौशिक शहा यांना गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, श्रीफळ, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरुप होते.
डॉ.के.एच.संचेती म्हणाले, त्वचा दान व जतन करण्याच्या क्षेत्रात काम करण्याचे सामाजिक कार्य डॉ.जयसिंग शिंदे यांसारखे डॉक्टर्स करीत आहेत. त्वचादानाची प्रक्रिया लोकांपर्यंत पोहोचली तर मोठया प्रमाणात त्वचादानाची चळवळ देखील उभी राहू शकते. त्याकरीता अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे.
डॉ.जयसिंग शिंदे म्हणाले, पुणे शहर व परिसरात भाजण्याच्या अनेक घटना होतात. अनेक वयोवृद्ध व्यक्ती एकटे राहतात, त्यामुळे त्यांच्याबाबत भाजण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. स्टोव्हचा वापर, गॅसचा स्फोट या घरगुती कारणांसह फॅक्टरीमधील अपघातांमुळे देखील भाजण्याच्या घटना घडतात. प्राथमिक, द्वितीय व तृतीय अशा तीन टप्प्यांमध्ये भाजलेल्या रुग्णांचे विभाजन केले जाते. त्यावर त्वचारोपण हा उपाय असून त्वचादानाकरीता जनजागृती मोठया प्रमाणात व्हायला हवी. कोणत्याही माहितीकरीता ९८९०९५५५५१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मोहन जोशी म्हणाले, रक्तदान, नेत्रदानासारख्या संकल्पना समाजामध्ये मोठया प्रमाणात रुजल्या आहेत. मात्र, त्वचादानाची संकल्पना अजूनही समाजामध्ये तेवढया प्रमाणात पोहोचली नाही. त्यामुळे जागर त्वचादानाचा- त्वचादान जनजागरण मोहिम हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. रक्तदान, नेत्रदानाच्या जशा चळवळी उभ्या राहिल्या तशी त्वचादानाची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.प्राची दुधाणे यांनी आभार मानले.