सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहातील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा
पुणे : चित्रकाराची भाषा ही रेषा व रंगातून पहायला मिळते. चित्रातून चित्रकाराच्या मनातील भावना दिसतात. आजच्या काळात केवळ चित्रकार म्हणून नाही, तर इंजिनिअर व इतरही क्षेत्रात चित्रकलेचा मोठा उपयोग आहे. करिअर म्हणून किंवा चित्रकलेच्या प्रदर्शनातून देखील चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे करिअर म्हणून चित्रकलेकडे पाहण्यासाठी चांगला काळ आहे, असे मत ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे पंधरावे वर्ष आहे. सप्ताहात महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित द.मि.कै.सि.धों.आबनावे कला महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे पार पडला. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, डॉ.विकास आबनावे, प्रकाश आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, गौरव बोराडे, प्रेमलता आबनावे, शिरीष आबनावे, योगेश आबनावे, प्रज्योत आबनावे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिळक रस्त्यावरील अभिनव कला महाविद्यालयाच्या अभिषेक आसोरे याने सर्व गटातून सर्वोकृष्ट पारितोषिक पटकाविले. राज्यातील सुमारे १ लाख १० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली होती. चित्रकला स्पर्धेचे यंदा १४ वे वर्ष होते.
मुरली लाहोटी म्हणाले, प्रदर्शनातील चित्रे समजण्यासाठी चित्रांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. त्याकरीता विविध प्रकारांतील चित्र प्रदर्शने पाहण्याची आवश्यकता आहे. चित्रकाराची दृष्टी वेगळी असते. त्या दृष्टीने साकारलेल्या चित्रांचा आनंद चित्रकार स्वत: देखील घेतात व रसिकांना देतात. त्यामुळे प्रत्येकाने ही कला जोपासायला हवी.
मोहन जोशी म्हणाले, राज्यात एकाच वेळी १ लाखाहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. दिवसेंदिवस या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यंदा दिव्यांग व दृष्टीहिन मुलांनी या स्पर्धेत मोठया संख्येने घेतलेला सहभाग हे स्पर्धेचे वैशिष्टय होते. या दिव्यांग मुलांच्या शासकीय ग्रेड परिक्षांची फी व प्रशिक्षण खर्च सप्ताहाच्या वतीने करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
डॉ.विकास आबनावे म्हणाले, भारतीय चित्रकलेला उज्ज्वल अशी परंपरा आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रापलिकडे देखील चित्रकलेमध्ये करिअरच्या मोठया संधी आहेत. सध्या अॅनिमेशन क्षेत्राला मोठा वाव असून त्याकरीता चित्रकला येणे आवश्यक आहे. चित्रांमधून सौंदर्यलहरी निर्माण होतात, असे म्हणतात. त्यामुळे पालकांनी बालकलाकारांना वाव देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सर्वोत्तम चित्रांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.कल्याणी साळुंखे, भागुजी शिखरे, रुपाली राऊत यांनी केले. गौरी पास्ते यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. ज्योती हिरे यांनी सूत्रसंचालन केले.
* निकाल :
ज्युनियर. व सिनियर के.जी. – १) समर्थ अवचट, २) श्रीजीत बाबेल, ३) विरांशी हचिंग्ज्, उत्तेजनार्थ : प्रज्वल कुदळे.
इयता १ली ते २री – १) अवंता भूतकर, २) निरजा मेहता, ३)प्रिशा आबनावे, उत्तेजनार्थ : अनन्या पोटे.
इयत्ता ३री ते ४थी – १) आर्वी पाटील, २) सानिका लांडगे, ३) ॠतुराज घाटे, उत्तेजनार्थ : शंतनु खोपडे.
इयत्ता ५वी ते ७वी – १) हर्ष नांगरे, २) विभा मानधना, ३) अर्णव भूतकर, उत्तेजनार्थ : शशी जयसिंगाणी.
इयत्ता ८वी ते १०वी – १) गौरी चंदनशिवे, २) आर्या गोगावले, ३) मृण्मयी माख, उत्तेजनार्थ : प्रथमेश प्रसाद, आदर्शनी पवार.
इयत्ता ११वी ते १२ वी – १) आभा मनीयार, २) सानिका सुरवसे.
दिव्यांग गट – १) रुणालीनी बडद, २) अभिषेक सावंत.
पालक गट – १) अशोक पाटील, २) मंगेश जगताप.
कला महाविद्यालय – १) विशाल सुतार, २) अर्चना केंगले, ३) सुमित गुंडेटी, उत्तेजनार्थ : सुशिलकुमार भिसे, स्नेहा नलावडे, स्वप्निल जाधव