मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी दिली पोस्ट ऑफिसला भेट
पुणे-डिजिटायझेशनच्या जमान्यात पत्र,पत्रलेखन,पोस्टाची तिकिटे आदीबद्दल मुलांना फार अपुरी माहिती आहे.आधुनिकतेच्या युगात विद्यार्थ्यांना या गोष्टी समजणे व माहिती होणे गरजेचे आहे.एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका देशातून दुसऱ्या देशात पत्र कशा पद्धतीने पोहोचते,पत्रांचे वेगवेगळे प्रकार,पूर्वीपासून पत्रव्यवहाराच्या चालत आलेल्या पद्धती आणि नवीन पद्धती याविषयी विद्यार्थांना माहिती व्हावी म्हणून भूगोल विषयांतर्गत क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.जनसंज्ञापनाच्या या महत्त्वाच्या पारंपारिक साधनांची तंत्रशुद्ध माहिती आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी.यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर,पुणे या शाळेतील इ.6 वी.च्या मुलांनी पोस्ट ऑफिस मध्ये प्रत्यक्षात जाऊन सर्व माहिती घेतली.यामध्ये शाळेतील मुलांसाठी पत्रलेखन उपक्रम घेण्यात आला.याप्रसंगी मुलांना पोस्ट ऑफिस कर्मचारी प्रियंका पंडीत,पोस्टमन सतिश पवार यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पत्राचे नमुने दाखविले.त्यामध्ये पोस्टाची तिकिटे,आंतरदेशीय पत्र,पोस्ट कार्ड,पोस्ट पॉकिट,मनी ऑर्डर फॉर्म,पैसे भरण्याची व पैसे काढण्याची पावती,स्पीड पोस्टची माहिती आदींचा समावेश होता.मुलांना फक्त पोस्टातून पत्र पाठवले जाते एवढेच माहीत होते.परंतु आजच्या उपक्रमामुळे प्रत्यक्षात पत्र लेखन कसे करावे हे प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना समजले.पोस्टाची प्रक्रिया कशी चालते.ते स्पष्ट करून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी खूप रंजक व जिज्ञासू प्रश्न विचारले.आपल्याला कोठे कोठे पत्र पाठवता येतात.व आता व्हाट्सअप आहे मग त्यासारखे मेसेज पोस्टातून जाऊ शकत नाही का ? स्पीड पोस्ट म्हणजे काय? या मुलांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन शंका निरसन केले.स्पीड पोस्ट या शब्दाचा अर्थ जलद गतीने जाणे असे समजून सांगितले.तसेच पोस्ट ऑफिस मधील सर्व योजनांची व ई-टपाल सर्व्हिस,पोस्ट तिकिटाची व पत्राच्या नमुन्याची प्रत्यक्षात माहिती दिली.विद्यार्थ्यांनी विविध पत्राचे नमुने व पोस्ट तिकिटे स्वतः हाताळून माहिती घेतली.सर्व मुलांनी एक एक पत्र लिहून आनंद व्यक्त केला.पत्र कसे लिहावे ? पत्ता कसा लिहावा ? पीन कोड याविषयी पोस्ट मास्तर चंदा घुले यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विद्यार्थी म्हणाले,आम्ही आता आमच्या सर्व नातेवाईकांना व मित्रांना पत्र पाठवू शकतो.यावेळी मुख्याध्यापिका संगिता लकारे म्हणाल्या की,विद्यार्थी स्वतःआता पोस्टात जाऊन पोस्टाचे कोणतेही व्यवहार करू शकतील.हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. नवीन काहीतरी केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.या उपक्रमाचे आयोजन खंडू खेडकर,नवेश पाटील,अमित ओमासे यांनी केले.या क्षेत्रभेटीसाठी उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे,पर्यवेक्षिका सीमा कूळधरण यांचे मार्गदर्शन मिळाले.या उपक्रमाचे संस्थेचे कौतुक कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख व संस्थेच्या सहकार्यवाह,नगरसेविका,पुणे महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.