मुंबई – राज्यातील राजकीय नाट्यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. 28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंसह सहा मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र शपथविधी होऊन दोन आठवडे उलटले तरी अद्याप पर्यंत खातेवाटप झाले नव्हते. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.खातेवाटपानुसार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शपथविधी झालेल्या प्रत्येकी दोन मंत्र्यांकडे विविध खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह, नगरविकास, वन, पर्यावरण, पाणीपुरवठा जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे.सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, उच्च तंत्रशिक्षण, कृषी, रोजगार हमी योजना, परिवहन खात्याची जबाबदारी असेल.
राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादनात शुल्क, अन्न व औषध प्रशासन खाते देण्यात आले आहे.त्याचप्रमाणे जयंत पाटील यांच्यावर वित्त, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार, अन्न नागरी पुरवठा आणि कामगार या खात्यांची जबाबदारी असेल.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा, वैदकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि पदुम खाते आहे.नितीन राऊत यांना सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून), आदिवासी महिला बालविकास, मदत व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सर्व खाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील.
मंत्र्यांची नावे व खात्याची जबाबदारी पुढीलप्रमाणे राहील :-
१. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री – कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.
२. एकनाथ शिंदे – गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.
३. छगन भुजबळ – ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
४. बाळासाहेब थोरात – महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.
५. सुभाष देसाई – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.
६. जयंत पाटील – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.
७. डॉ. नितीन राऊत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.