कोरोनावर उपाय शोधण्यासाठी ऑनलाईन हाकेथॉन
फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या उपक्रमाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रायलाचा सहयोग
पुणे : जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना (कोविड-१९) व्हायरसवर उपाययोजना करण्यासाठी ऑनलाईन हाकेथॉनस्पर्धेचे आयोजन केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशनच्या (फिक्की फ्लो) पुणे चॅप्टर आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रायलाच्या वतीने या हाकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, भारत सरकारचे स्टार्टअप हब, कौशल्य व उद्योग मंत्रालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क, एपीजे अब्दुल कलाम सेंटर, रोबोटेक्स इंटरनॅशनल, गॅरेज ४८, एक्सेलरेट इंडिया आदी संस्थांनी या हाकेथॉनला सहयोग दिला आहे, अशी माहिती हाकेथॉनच्या मुख्य संयोजक आणि फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया यांनी दिली.
आजघडीला कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी ही ऑनलाईन हाकेथॉन आयोजिली आहे. याद्वारे लोकांकडून विविध कल्पना मागविण्यात येणार आहेत. यामध्ये व्यक्तिगत किंवा सांघिक स्वरूपात सहभागी होता येईल. कोरोनामुळे परिणाम होणाऱ्या अवैद्यकीय अडचणींवरही उपाय शोधण्यासाठी स्पर्धकाना प्रोत्साहित केले जाणार आहे. २५ मार्च रात्री १२ पर्यंत आपण आपली कल्पना सादर करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी www.hackacause.in/ www.garage48.org. यावर भेट देण्याचे आवाहन रितू छाब्रिया यांनी केले आहे.
पहिल्या तीन कल्पनांना एक लाखांपर्यंतची रोख पारितोषिके दिली जाणार असून, यातील निवडक ३०० कल्पनांना भारतीय तज्ज्ञ आणि युरोपियन (ईयू) पॅनल प्रत्येक पायरीवर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. २७ ते २९ मार्च या कालावधीत सलग ४८ तास ही हाकेथॉन सुरु राहणार आहे. या साथीच्या आजाराशी दोन हात करण्यासाठी प्रभावी उपाय कार्यान्वित व्हावा, यासाठी सायन्स टेक्नॉलॉजी पार्क, स्टार्टअप हब आणि एक्सेलरेट इंडिया हे विजेत्या कल्पनाना विकसित करणार आहेत. आपण विलगीकरण कालावधीत कोरोनाचा सामना करण्यासाठीचे उपाय द्यावेत, हा यामागचा उद्देश आहे. देशातील नागरिकांनी या कोरोनावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत, हे महत्वाचे आहे, असे छाब्रिया यांनी नमूद केले.
रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “स्पर्धेच्या स्वरूपात हाती घेतलेल्या या ओनलाईन मिशनमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे. अशा आव्हानात्मक काळात क्रिएटिव्ह लोकांकडून निश्चित चांगले उपाय सुचवले जातील. या जागतिक स्तरावर साथीला आपण हरवायचे आहे. या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, रोबोटिक्सच्या साऊथ एशिया हेड पायल राजपाल आणि फिक्की फ्लोच्या अध्यक्ष हरजिंदर कौर आदीचे आभार मानते. तेव्हा जबाबदार भारतीयांनी आपल्यातील कल्पनाशक्ती जागृत करून कोरोनाला ठरविण्यासाठी उपाय सुचवावेत. या जगाला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी एकत्रित लढा उभारूया.”