पुण्यात २२, २३ फेब्रुवारीला रंगणार उद्योजकांची बॉक्स क्रिकेट लीग
बीएनआय व सुरतवाला ग्रुपतर्फे ‘बीएनआय क्वेस्ट २०२०’चे आयोजन
पुणे : उद्योजकांमध्ये क्रीडा संस्कृती, तसेच तंदुरुस्तीविषयी आवड निर्माण व्हावी, परस्परांमध्ये समन्वय, सर्वसमावेशक भावना आणि नातेसंबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने बीएनआय पुणे ईस्ट-बीएनआय पुणे नॉर्थ आणि सुरतवाला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बीएनआय क्वेस्ट २०२०’ या बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (दि. २२) व रविवारी (दि. २३) कोरेगाव पार्क येथील हॉटफूट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे, अशी माहिती ‘बीएनआय’चे कार्यकारी संचालक भारत डागा आणि सुरतवाला ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सुरतवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुरतवाला ग्रुपचे उपाध्यक्ष हितेंद्र सुरतवाला, सीएफओ दिगोंता दास, संयोजन समितीतील आनंद बेल्लद, सिद्धार्थ केसकर, प्रणवकुमार चित्ते, भूषण लोहिया, विनायक सणस आदी उपस्थित होते.
भारत डागा म्हणाले, “संस्थेच्या वतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. बीएनआय सदस्यांमध्ये टीम बिल्डिंग, नेटवर्किंग व्हावे, तसेच नेहमीच्या व्यवसायाच्या धावपळीतून थोडा विरंगुळा मिळवा, या उद्देशाने ही स्पर्धा महत्वाची असते. व्यावसायिकांचा ग्रुप असलेली ही संस्था आहे. यंदा ‘क्वेस्ट २०२०’मधून महिला व पुरुष क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. यातील अनेकजण मूलतः खेळाडू असून, त्यांच्यातील खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठीही ही स्पर्धा महत्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले असून, प्रत्येक संघात १२ खेळाडू असणार आहेत. जवळपास १००० पेक्षा अधिक सभासद या स्पर्धेत सहभागी होत आहेत. बीएनआय पुणेमध्ये प्रथमच अशा प्रकारची मोठी स्पर्धा होत आहे.”
हितेंद्र सुरतवाला म्हणाले, “उद्योजकांना खेळांसाठी प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा आहे. नवीन उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी अशा उपक्रमांची मदत होते. त्यामुळे सुरतवाला ग्रुप या उपक्रमात सहभागी होत आहे.”